दसऱ्याच्या मुहूर्ताला शेतकऱ्यांच्या घरात पांढरे सोने आलेच नाही दसरा सण होणार कडू ;सणाला भासणार पैशाची चणचण

सहसंपादक : रामभाऊ भोयर

वातावरणातील बदल आणि
मधल्या काळात पावसाची जोरदार बॅटिंग यामुळे कापूस हे पीक अजूनही शेतकऱ्यांच्या घरात आले नाही. दसरा सणापूर्वी कापूस वेचणी करून तो बाजारात यायचा, पण यावर्षी कापूस शेतकऱ्यांच्या घरात आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दसरा सणाला पेशाची चणचण भासणार असून, सण कडूच साजरा करावा लागणार आहे.
राळेगांव तालुक्यात खरीप हंगाम २०२३-२४ मध्ये कापूस या नगदी पिकाचे क्षेत्र ४० हजार हेक्टर होते. तालुका हा नैसर्गिक संकटात सापडला आहे. ऐन खरीप हंगामात पेरणीच्या काळात पाऊस गायब झाला. नंतरच्या काळात अतिवृष्टी, पूरपरिस्थिती आणि पिकाला पावसाची गरज नसताना पुन्हा जोरदार पाऊस झाल्यामुळे कापूस पिकांची वाढ खुंटली त्यातच पिकाला लागलेले फूल, पाते गळून गेले. अशातच रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने टिकून राहिलेले एक-दोन बोंड फुटलेच नाहीत. चार- दोन बोंड फुटले आहेत, तेही वेचणीला परवडत नाही म्हणून शेतकऱ्यांनी वेचणी केली नाही.
ऑगष्ट सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसाने कहर करून खरीप हंगामातील कापूस हे नगदी पीक
गिळले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
उताराच येणार नसल्याने शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर उभा राहणार आहे.
त्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे.
नगदी पिकाची लागवड
खरीप हंगाम २०२३-२४ मध्ये शेतकऱ्यांनी नगदी पीक समजल्या जाणाऱ्या पांढऱ्या सोन्याची लागवड केली. महागडे बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी केले. पण अतिप्रमाणात झालेला पाऊस, पावसाचा खंड यामुळे दसरा सणापूर्वी कापूस पीक शेतकऱ्यांच्या घरात आले नाही.
बाजारातही कापूस नाही
कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या घरातच कापूस आला नसल्याने तो बाजारातही आला नाही. त्यामुळे दसरा लेकीबाळींना कपडे कसे घ्यावे, दसरा गोडधोड कशी करावी, ही चिता घर करून आहे.