
प्रतिनिधी::प्रवीण जोशी
ढाणकी
शहरातील नविन बस स्थानक, गल्लीसह ग्रामीण भागात विविध वसाहतींमध्ये मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट दिसून येत आहे. यावर तत्काळ उपाय योजना करण्याची मागणी सर्वच स्तरामधून पुढे येत आहे. ढाणकी शहरातील, बसस्थानकासह विविध ठिकाणी मोकाट कुत्र्यांनी गेल्या काही दिवसापासून उपदव्याप माजविला असून त्यांच्या शरीरावर खरूज तथा पिसा आढळून येत असून त्यांच्या शरीरावरील केस गळती होत आहे. त्यातील काही कुत्रे मनुष्य दिसताच घुरघुर करतात. त्यांच्या शरीरावरील खरूज व जखमांमुळे त्यांच्या शरीराला मोठ्या प्रमाणात खाज सुटत आहे. अशातच ते पिसाळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील काही महिन्याआधी अशाच मोकाट कुत्र्यांनी काही नागरिकांना लचके तोडल्याच समजते.त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी या मोकाट कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिक करीत आहे. सदरील मोकाट कुत्र्यांना कुणीच वाली नसून या अनोळखी पंचवीस ते तीस कुत्र्यांचा कळप दिवसभर शहराच्या विविध भागात मोकाटच फिरून दहशत निर्माण करीत आहे. रात्रीच्या वेळी भुंकने विवाळणे तर परिसरात फिरणाऱ्या शेळ्या, कोंबड्या व अन्य मुक्या प्राण्यांच्या पाठलाग करणे तसेच त्यांच्या शरीरांचे लचके तोडण्याचे व दहशत निर्माण करण्याचे उपदव्याप या कुत्र्यांनी सध्या परिसरात सुरू केलेले आहे. विशेष म्हणजे सदर कुत्रे हे अनोळखी असून कुण्यातरी अज्ञात व्यक्तींनी पंचवीस ते तिस कुत्रे परिसरात आणून सोडल्याची चर्चा आहे. कदाचित कुत्रा चावलेल्या रुग्णांना प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात भर्ती केले तर तूर्तास तरी साधा कुत्रा चावल्याची रॅबीज लस उपलब्ध आहे. मात्र येथेही कधी – कधी महागड्या लस तथा औषधांचा वानवा असते तर पिसाळलेला कुत्रा चावला तर त्याचे रेबीज शिरम ही महागडी लस ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध राहात नाही. मग असे रुग्ण इतरत्र हलवावी लागतात. त्यामुळे तालुका तथा ग्रामीण रुग्णालयांना लस उपलब्ध व्हावी अशी मागणी नागरिक करीत आहे. मोकाट कुत्र्यांच्या सुळसुळाटाने नागरीक त्रस्त झाले आहेत. रात्रभर भुंकणे आणि दिवसा वाहनधारकांच्या मागे धावणे, पादचाऱ्यांवर गुरगुरणे या त्यांच्या दिनक्रमामुळे नागरिक
हतबल झाले असून नगरपंचायत प्रशासन आणि पशुवैद्यकीय
विभागाने या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा. मोकाट कुत्री हा एक गंभीर प्रश्न बनला आहे. दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दरम्यानच्या काळात नागरिकांवर हल्ले करण्यापर्यंत मोकाट कुत्र्यांची मजल गेली आहे.
शाळेत जाणारे विद्यार्थी, रस्त्यावरून जाणारे नागरिक,
दुचाकीस्वार यांना कुत्र्यांकडून लक्ष केले जाते. बऱ्याचदा
घाबरून वाहनधारकांचे अपघात होतात. विशेष म्हणजे ही
सर्व कुत्री एकत्र समूहाने राहतात. रात्रभर एकमेकांवर कुत्री
भुंकत असल्याने नागरिकांची झोप उडविण्याचे काम करतात
तर दिवसा पादचाऱ्यांना त्रस्त करतात. सुमारे पंचवीस ते तिस कुत्री बाजारपेठेपासून ते मेन रोडपर्यंत वावरत असल्याचे चित्र आहे. वाहन, नागरिक किंवा अन्य कुत्रे दिसले की, ते अचानक हल्ला चढवितात. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. कळपाने फिरणाऱ्या मोकाट कुत्र्यांमुळे घराबाहेर पडणेही धोक्याचे झाले असल्याने प्रशासनाने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली.
…..चौकट…..
मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मागणी !
दिवसभर परिसरात सार्वजनिक ठिकाणी मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त लावण्यासाठी श्वानपथक मित्र किंवा वन्यप्राणी मित्र यांना पाचारण करुन या परिसरात दहशत निर्माण करून नागरिकांना व अन्य सजिवांना नाहकचा त्रास देणाऱ्या या मोकाट कुत्र्यांचा त्वरीत बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
