उमरेड येथे सुरू असलेल्या श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ नाम संकीर्तन सोहळ्याची सांगता, टाळ मृदुंगाच्या गजरात गावकरी भक्तिमय

सहसंपादक : रामभाऊ भोयर

उमरेड येथे गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या श्रीमद् भागवत कथा व ज्ञानयज्ञ नाम संकीर्तन सोहळ्याची आज दि १२ जानेवारी रोजी सांगता करण्यात आली. श्रीमद् भागवत कथेचे वाचन ५ ते ११ जानेवारी पर्यंत हभप भागवताचार्य राहुल महाराज मोरे (आळंदीकर) यांच्या अमृत वाणीतून सकाळी ९ ते ११ व रात्री ९ ते ११ या कालावधीत करण्यात येत होते.

श्रीमद् भागवत कथेतील नृसिंह अवतार, श्रीकृष्ण जन्मोत्सव, गोवर्धन पूजा,दैनंदिन कीर्तन,भजन,हरिपाठ,काकडा आरती, रामधून,हरी जागर आदी विविध विषयावर प्रवचन व राधे राधेच्या गजरात संपूर्ण गाव भक्तिमय झाला होता. या सप्ताहामध्ये दैनंदिन हरी कीर्तनाच्या कार्यक्रमामध्ये संपूर्ण उमरेड वासी भक्तिमय झाले होते.

सप्ताहाच्या शेवटी आज राविवारला गावातील मुख्य मार्गावर श्री संत ज्ञानेश्वर माऊलीची पालखी काढण्यात आली. पालखीमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हरी नामाचे भजन करून टाळ मृदुंगाच्या गजरात संपूर्ण गावातून पालखी काढण्यात आली होती. महिला मंडळीनी रस्त्यावर रांगोळी काढून पालखीची शोभा वाढविली होती. तर 2 वाजता काल्याचे कीर्तन हभप राहुल महाराज मोरे (आळंदीकर) यांच्या वाणीतून होऊन त्यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली नंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. या महाप्रसादाचा उमरेड तसेच बाहेर गावातील हजारो भाविकांनी लाभ घेतला. सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी संपूर्ण उमरेड गावकरी मंडळींनी अथक परिश्रम घेतले.