
वरोरा –
गावागावाशी जागवा, भेदभाव समूळ मिटवा! उजळा ग्रामोन्नतीचा दिवा, तुकड्या म्हणे !!
याच साठी सामुदायिक प्रार्थना ! हा मार्ग दाविला जना
हीच आजची उपासना!! सर्वांचीया हिताची – ग्रामगीता
आजच्या विस्कटलेल्या समाज व्यवस्थेत परिवर्तन करण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या नामरुपात गुरुदेव शक्ती आहे. अशा ब्रह्मलीय वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा 56 वा पुण्यस्मरण सोहळा हनुमान मंदिर देवस्थान बांद्रा येथे तीन दिवस विविध रचनात्मक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष जया चिंचोलकर सरपंच ग्राम पंचायत बांद्रा, उद्घाटक डॉ. अमित झिले, प्रमुख पाहुणे म्हणून ग्यानीवंत गेडाम पत्रकार व सामाजिक कार्यकर्ता, रामदास आस्कर अध्यक्ष गुरुदेव सेवा मंडळ बांद्रा, रोशन दडमल उपसरपंच बांद्रा, अविनाश चिंचोलकर पोलीस पाटील बांद्रा, देवराव दडमल माजी पंचायत समिती सदस्य, चंपत हक्के, दिगंबर कुबडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
गावाचे भवितव्य करावया उज्वल ! पाहिजे प्रचारक शक्ती प्रबळ !! प्रचारक अंगी पाहिजे शिल ! सत्य चरि नम्रता!!
या तीन दिवसीय कार्यक्रमात ग्रामसफाई, कलश स्थापना, सामुदायिक ध्यान,रामधून व ग्रामगीता वाचन, चंपक हक्के यांचे ग्रामगीतेवर प्रवचन, महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम, हनुमान महिला मंडळ व भाग्यश्री महिला भजन मंडळ बांद्रा यांचा भजनाचा कार्यक्रम, सामुदायिक प्रार्थना व प्रवचन, दादाजी वैद्य यांचे ग्रामगीतेवर प्रवचन, अंकित सोनेकर जय गुरुदेव नाट्य कला समाज प्रबोधन मंडळ वरोरा यांचा समाज प्रबोधनाचा कार्यक्रम इत्यादी रचनात्मक कार्यक्रमांनी राष्ट्रसंतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
रामधून पालखी शोभायात्रेसह गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत बाल गणेश मंडळ ढिवरी पिपरी, हनुमान सांस्कृतिक भजन मंडळ बांद्रा, भाग्यश्री महिला भजन मंडळ बांद्रा, नवप्रभात महिला भजन मंडळ बांद्रा, शारदा महिला भजन मंडळ केसलाबोडी, गुरुदेव भजन मंडळ केसलाबोडी व गुरुदेव भजन मंडळ बोरगाव हे सहभागी झाले होते.
कार्यक्रमात प्रदीप पाल चौधरी सप्त खंजिरी निर्माते, राष्ट्रीय समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांची शिष्य यांचे कीर्तनाचे कार्यक्रमचा लाभ परिसरातील गुरुदेव प्रेमीं व नागरिकांनी घेतला.
विश्वी होऊ शकेल शांतता! तेथे गावाची कोण कथा!
सामुदायिक प्रार्थनाच करील एकता! नित्यासाठी तुकड्या म्हणे!!
हा कार्यक्रम गुरुदेव सेवा मंडळ व हनुमान मंदिर कमिटी व बांद्रा येथील समस्त नागरिकांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात सयाजी दडमल व मुकिंदा श्रीरामे यांच्या वतीने अल्पोहाराची व्यवस्था करण्यात आली होती. शेवटी महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.