मीटर साठी लाच देणे असेल तर मग आकुडे टाकणारे दोषी कसे ?
[ आता ‘ लाडकी सौरऊर्जा योजना’ राबविण्याचीच गरज ]

सहसंपादक: रामभाऊ भोयर

 

वीज मीटर बसवण्यासाठी अतिरिक्त पाच हजाराची लाच मागणारा सहायक अभियंता अखेर लाच घेतांना पकडला गेला.महावितरण कार्यालयातच लाच स्वीकारण्याचा निरढावलेपणा या विभागाची मर्दूमकी (?) अधोरेखित करणारा आहे. वीज मीटर बसवण्यासाठी जर लाच दयावी लागत असेल तर गोर -गरीब नागरिकांनी आकुडे टाकून वीज घेतली तर दोष कुणाला दयावा? असा प्रश्न या निमित्ताने पुढे आला आहे.
वीज वितरण कपंनीच्या तुघलकी कारभाराचे किस्से नवीन नाही.कर्तव्यदक्ष,दस्तूरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे या खात्याचा कारभार असल्याने नागरिकांना सुलभ, दर्जेदार व माफक किमतीत वीज मिळावी अशी अपेक्षा आहे. नवीन वीज मीटर ला नागरिकांचा प्रचंड विरोध आहे पन त्यावर कुणी बोलत नाही.धनदांडग्याना जास्त वीज वापर असताना कमी वीज बिल व गोर -गरिबांना कमी वापर असताना जास्त बिल हा चमत्कार फक्त वीज वितरणच करू जाने, अशी अवस्था आहे. त्यातच प्रत्येक बाबीवर पैसे मोजल्या खेरीज काम होत नाही हा अनुभव अनेकांना जेरीस आणतांना दिसतो. राळेगाव गुजरी मार्गांवर वर्ष भरा पासुन रस्त्या लगत चे तार लोंबकळत आहे ते तसेच ठेऊन सारे विसरून गेले. अनेकांची नवीन वीज मीटर ची प्रतीक्षा संपता संपत नाही. तांत्रिक कारणांनी खंडीत झालेला वीज पुरवठा मोठ्या मिनतवाऱ्या करून सुरु करावा लागतो. अशी अनेक अडवणूकीची कामे करून हा विभाग प्रसिद्ध पावला आहे.
जगदीश ढुमणे यांनी लाच स्वीकारून खरे तर या विभागाची कार्यपद्धतीच समोर आणली आहे. आधुनिक काळात वीज ही जवळ जवळ जीवनावश्यक गरज या सदरात मोडनारी बाब झाली यात दुमत नसावे. प्रत्येकाचा कधी ना कधी समंध या विभागाशी येतोच नागरिकांची अडवणूक करण्यात अनेकांना आसुरी आनंद मिळतो अशी अवस्था आहे. यंदा नापिकीचे साल आहे. शेतमालाला भाव नाही, बाजारात मालाला उठाव नाही. शेतमालावर आधारित अर्थव्यवस्था हे राळेगावचे वैशिष्ट्य आहे. अशा वेळी सर्व बाजूनीं आर्थिक अडचणीत असलेला इथला नागरीक लाचेच्या मागणीने अधिकचा हतबल होतो. त्याचा संताप कुठेतरी निघतोच हे त्याचे दृष्य परिणाम आहे.
लोकसेवक असणाऱ्या सर्वांनीच इथल्या सर्वसामान्य माणसाची आर्थिक कमकुवत बाजू समजून घ्यायची कधी नव्ह्ये एव्हडी गरज आज निर्माण झाली आहे. एखादा खमक्या निघतो तो लाच लुचपत विभागाकडे जातो पन शेकडो, हजारो नागरीक कार्यालयाच्या चकरा मारून थकतात व शेवटी लाच देऊन आपली कामे करून घेतात, अशा किती घटना घडतं असतील याचा अंदाज ही केल्या जाऊं शकत नाही. लाचेच्या सापळ्यात अडकतो त्याची बातमी होते पन ज्या सर्व सामान्य माणसाला वेगवेगळ्या पातळीवर लाच देऊनच कामे करावी लागतात त्यांच्या वेदनेची नोंद कुठेही होत नाही. त्या मुळेच या प्रकरणा बाबत कुणी तरी अडकला हा आनंद माणण्यात अर्थ नाही. म्हातारी गेल्याचे दुःख नाही पन काळ सोकावतो आहे त्याचे काय? याचे उत्तर देण्याची जबाबदारी नेमकी कोण घेणार याचे उत्तर मात्र कुणाकडेच नाही.

लाडकी सौरऊर्जा वीज योजना राबविण्याची गरज


सौरऊर्जा हा विजेच्या गँभीर प्रश्न|वर कारगर उपाय होऊ शकतो. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पाऊले त्या दिशेने पडतांना दिसतात, ही सकारात्मक बाब म्हणावी लागेल. मात्र या मध्ये शासनाने याचा खर्च उचलला गोर -गरिबांना मोफत पॅनल ही योजना सुरु केल्यास त्याचे अनेक अंगानी फायदे होऊ शकतात राज्याच्या विजेची मागणी कमी होईल त्या मुळे तिजोरीवरचा तान कमी होऊ शकतो. कोळसा वापर कमी झाल्यास प्रदूषणाचे मार्ग बंद करता येईल. वीज चोरी ची समस्या निकाली निघेल आणि गरिबांना मोफत वीज उपलब्ध होईल. ही वन टाइम ईनवेष्ठमेंट असल्याने दरवर्षी चा एकूण खर्च गृहीत धरल्यास राज्याच्या आर्थिक बोजा कमी होईल. लाडकी बहीण योजने पेक्षा ही लाडकी सोलर वीज योजना अधिक महत्वाकांक्षी सिद्ध होईल.