
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यात अवैध रेती वाहतुकीवर आळा घालण्यासाठी महसूल विभागाने पुन्हा एकदा सक्रीय होत सकाळच्या सुमारास मोठी कारवाई केली आहे. आज दिनांक 05 एप्रिल 2025 रोजी सकाळी अंदाजे 4.30 वाजताच्या दरम्यान मौजा अंतरगाव परिसरात अवैधपणे रेतीची वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडला.सदर कारवाई महसूल विभागाचे मंडळ अधिकारी अनिल कनसे व गाईड चव्हाण, तसेच ग्राम महसूल अधिकारी सरतापे व तुमस्कार (राळेगाव) यांच्या संयुक्त पथकाने केली. कारवाईदरम्यान अवैधरीत्या रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला ताब्यात घेण्यात आले.
जप्त केलेल्या ट्रॅक्टरचा पंचनामा जागेवरच करून, पुढील दंडात्मक आणि कायदेशीर कारवाईसाठी हे वाहन तहसील कार्यालय, राळेगाव येथे जमा करण्यात आले आहे. संबंधित ट्रॅक्टरच्या मालकाविरुद्ध कारवाईचे प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.या कारवाईमुळे अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टोळ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महसूल विभागाने अशा प्रकारच्या कारवाया सातत्याने सुरू ठेवाव्यात, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे.
तालुक्यातील विविध भागांतून मोठ्या प्रमाणावर रेती चोरी आणि बेकायदेशीर वाहतूक होत असल्याचे अनेक वेळा निदर्शनास आले असून, त्यामुळे नैसर्गिक स्रोतांवर मोठा परिणाम होत आहे. शासनाच्या नियमांची पायमल्ली करून सुरू असलेल्या या अवैध धंद्यावर कठोर कारवाईची गरज वारंवार व्यक्त करण्यात येत आहे.
महसूल प्रशासनाने वेळेवर हस्तक्षेप करून दाखवलेली तत्परता निश्चितच कौतुकास्पद आहे. भविष्यात अशीच कारवाई सुरू राहिल्यास अवैध रेती चोरीला आळा बसण्यास मदत होईल.
