
सहसंपादक: रामभाऊ भोयर
राळेगाव येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ग्राहकांकरिता अनेक सुविधा बँकेच्या शाखेत नसल्याचे निदर्शनास आले असल्याने ग्राहकांना विविध सेवा सुयोग्यपणे उपलब्ध करून देण्यात याव्या, अशा आशयाचे निवेदन बँकेचे व्यवस्थापक राजूभाऊ सुरजुसे यांना राळेगाव तालूका ग्राहक पंचायत तर्फे देण्यात आले. यावेळी ग्राहक पंचायतचे तालुका अध्यक्ष डॉ .के. एस. वर्मा, सचिव माजी प्राचार्य मोहन देशमुख, कोषाध्यक्ष भूपेंद्र कारीया हजर होते.
बँक ग्राहकांच्या पैसे टाकण्याच्या व काढण्याच्या काउंटरवर पंखा लावण्यात यावा, काउंटर पासून दूर असलेल्या ठिकाणी नवीन पंखा लावावा, उन्हाळा काळात बँकेत येणाऱ्या ग्राहकां करीता कुलर लावण्यात यावा, बँकेच्या परिसरात पिण्याच्या थंड पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, मे जून महिन्यात कृषी कर्जाची रक्कम, शेतकरी सन्मान योजना, लाडकी बहीण सह इतर शासकीय योजनांच्या ग्राहकांची व्यवहारा करीता बँकेत गर्दी वाढते. या काळात बँकेसमोर पटांगणात सावलीची सुविधा करण्यात यावी, दुचाकी व चार चाकी वाहनां करीता बँकेच्या परिसरात जागा निश्चित करून देऊन तेथे वाहने पार्किंग करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, बँकेच्या आतील परिसरात अनेक वर्षापासून रंगरंगोटी झालेली नसल्याने भिंती अस्वच्छ दिसत आहे. स्वच्छतेसाठी रंगरंगोटी करण्यात यावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील झाडगाव, वाढोणा बाजार, वडकी, खैरी येथे सुद्धा अशाच प्रकारच्या सुविधा नाही. आवश्यक त्या सुविधा या शाखेत सुद्धा उपलब्ध करून देण्यात याव्या.
मुख्याधिकारी व व बँकेच्या संचालक वर्षाताई राजेंद्र तेलंगे,यांना सुद्धा वरील मागणीच्या निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या.
