
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान मानले जाणारे वर्धा नदीकाठचे जागजई (ता. राळेगाव) येथे बुद्ध पौर्णिमेनिमित्त यावर्षीही हजारो आदिवासी बांधवांनी पवित्र स्नान व देवदर्शनासाठी गर्दी केली. यवतमाळ जिल्ह्यासह विदर्भभरातून आलेल्या भाविकांनी नदीपात्रात स्नान करून धार्मिक विधींमध्ये सहभाग घेतला.
यावेळी राळेगाव तालुका प्रशासनाच्या वतीने भाविकांसाठी पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक, वनविभाग आणि पोलिस प्रशासन यांच्याकडून योग्य त्या सर्व सुविधा व बंदोबस्त उपलब्ध करून देण्यात आला.
उपविभागीय अधिकारी नितीन हींगोले, तहसीलदार अमित भोईटे, गटविकास अधिकारी केशव पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे, तसेच पोलिस निरीक्षक सिताराम मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ठोस व्यवस्था करण्यात आली होती. पवित्र स्नानासाठी येणाऱ्या भाविकांना अडचण होऊ नये यासाठी ग्रामसेवक संजय शिल्पे व जागजई गावचे सरपंच यांच्या समवेत रस्त्यांची पाहणीही करण्यात आली.
दरम्यान, राज्याचे आदिवासी विकास मंत्री ना. प्रा. डॉ. अशोक उईके यांनी देखील जागजई येथे भेट देऊन देवदर्शन घेतले. महसूल, पंचायत समिती, पोलीस व इतर विभागांचे अधिकारी व कर्मचारी 24 तास सज्ज होते. नदीपात्रात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रत्येक दहा फुटांवर सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
या व्यापक तयारीमुळे सर्व भाविकांना पवित्र स्नान व दर्शन शांततेत व सुरक्षिततेत पार पडण्यात आला.
