
राळेगाव तालुक्याला प्रथमच मिळाले मोठे नेतृत्व, कार्यकर्त्यांत जल्लोषाचे वातावरण
भारतीय जनता पक्षाच्या यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी अँड. प्रफुल्ल चौहान यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या या निवडीने संपूर्ण जिल्ह्यातून त्यांचे स्वागत आणि अभिनंदन करण्यात येत आहे. विशेषतः राळेगाव तालुक्यासाठी ही निवड अभिमानास्पद ठरत असून, तालुक्याला प्रथमच पक्षाच्या जिल्हास्तरीय नेतृत्वाची संधी मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
अँड. चौहान हे बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय स्वयंसेवक राहिले आहेत. त्यांनी सामाजिक, राजकीय आणि संघटनात्मक क्षेत्रात आपले प्रभावी योगदान दिले असून, त्यांच्या संयमी नेतृत्वशैलीला तसेच कार्यक्षमतेला सर्वत्र मान्यता मिळाली आहे.त्यांनी यापूर्वी विश्व हिंदू परिषद या संघटनेचे जिल्हा मंत्री म्हणून काम पाहिले असून, दि. यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक या संस्थेचे संचालक म्हणूनही त्यांनी आपली आर्थिक जाण दाखवून दिली आहे. याशिवाय राळेगाव नगर पंचायतचे पहिले उपाध्यक्ष, भाजपचे जिल्हा सरचिटणीस व जिल्हा उपाध्यक्ष अशा विविध पदांवर काम करत त्यांनी संघटनेला बळकटी दिली आहे.
त्यांच्या संयमी स्वभाव, स्पष्ट विचारसरणी आणि पक्षनिष्ठेमुळे त्यांनी पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यामुळेच पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास दाखवत जिल्हाध्यक्षपदाची धुरा त्यांच्याकडे सोपवली आहे.या निवडीनंतर राळेगाव तालुक्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. ठिकठिकाणी फटाके वाजवून, पेढे वाटून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. जिल्ह्यातील विविध संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांनी अँड. चौहान यांचे फोनवरून, तसेच भेटून अभिनंदन केले.
अँड. प्रफुल्ल चौहान यांनी आपल्या निवडीबद्दल प्रतिक्रिया देताना सांगितले की, “ही जबाबदारी मला पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने दिली आहे, ती मी पूर्ण निष्ठेने पार पाडणार आहे. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन भाजपची मूल्ये, विचार आणि कार्यपद्धती अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्नशील राहीन.”
त्यांच्या नेमणुकीमुळे यवतमाळ जिल्ह्यात भाजपला संघटनेच्या दृष्टीने नवे नेतृत्व मिळाले असून, आगामी काळात पक्षसंघटना अधिक मजबूत होईल, असा विश्वास पक्षातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
