
सहसंपादक: रामभाऊ भोयर
वनोजा ते रोहणी हा पांदन रस्ता अतिक्रमणामुळे बंद पडल्याने परिसरातील शेतकरी अत्यंत त्रस्त झाले आहेत.हा रस्ता त्यांचा शेतीसाठी आणि दैनंदिन वापरासाठी अनिवार्य असून, त्यावर अतिक्रमण झाल्याने त्यांचे कामकाज पूर्ण ठप्प झाले आहे.
शेतकरी बांधव यांसह अनेक शेतकऱ्यांनी वारंवार तहसीलदार राळेगाव यांना निवेदन दिले,परंतु तहसील स्तरावर त्यांना फक्त उडवा-उडवीची उत्तरे मिळाली. त्यांचा त्रास कमी न होता वाढतच असल्याने,कृषी अभ्यासक प्रा.पंढरी पाठे यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक १९ मे (सोमवार) रोजी यवतमाळ जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.निवेदनात नमूद केल्याप्रमाणे,तहसील भू-अभिलेखाच्या नकाशानुसार वनोजा ते रोहणी हा पांदन रस्ता असून तो ४६, ४७, ४८, ७३, ७४, ९८, ९७, ७६, ७७, ७८, ७९, ८०, ८९, १० इत्यादी सन च्या कास्तकारांचा आहे.परंतु आजूबाजूचे काही कास्तकारांनी त्यावर अतिक्रमण केले असून,शेतकऱ्यांना या मार्गाने जाण्यापासून रोखले जात आहे.
यावेळी शेतकऱ्यांना केवळ मनाईच नाही तर धमक्या देऊन “हातपाय तोडून टाकण्याची” देखील धमकी दिली जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे.दोन कास्तकारांकडून शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे.
प्रा.पंढरी पाठे म्हणाले,”हा प्रश्न केवळ एका रस्त्याचा नाही,तर शेतकऱ्यांच्या जीवनाशी संबंधित आहे.त्यांच्या शेतीसाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे.प्रशासनाने तात्काळ याकडे लक्ष देऊन अतिक्रमण हटवावे आणि रस्ता मोकळा करावा.”शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे हक्काच्या मार्गाने न्याय मिळावा,अशी तीव्र मागणी केली आहे अन्यथा सर्व शेतकरी तीव्र आमरण उपोषण करील असा शेतकर्यांनी इशारा दिला आहे.जिल्हाधिकारी यवतमाळ कडून याबाबत सकारात्मक पाऊले उचलल्याची अपेक्षा केली जात आहे.यावेळी मनोज येणोरकर,सचिन काटेकर,हिरामण धोंगडे,पंढरी राऊत, गोपाल शेंडे,निखिल गुडधे,किसना महाजन, अशोक गुल्हाने,योगेश काटेकर,प्रा.पंढरी पाठे,इत्यादी उपस्थित होते.
