

सहसंपादक : रामभाऊ भोयर
वरुणराजा मेहेरबान झाला आणि शेतशिवारात हिरवळ दाटली. पिकेही डोलायला लागल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. याच दरम्यान शेतातील पिकांवर कीटकजन्य रोगाचे आक्रमण सुरू झाल्याने या प्रादुर्भावातून सावरण्यासाठी कृषी विभागाकडून वेळोवेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळण्याची गरज असताना कृषी विभागाकडून सहकार्य मिळत नसल्याची ओरड शेतकऱ्यांकडून होत आहे. त्यामुळे तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कामकाजाची पद्धत जाणून घेण्याकरिता आमचे प्रतिनिधी कार्यालयात गेले असता सकाळी साडेनऊ वाजतापासून सव्वा दहा वाजतापर्यंत प्रतिनिधींनी कार्यालयाजवळ उपस्थित राहून पाहणी केली असता दहा वाजले तरीही काही कार्यालये कुलूपबंद होती तर काही कार्यालयामध्ये कर्मचारीच उपस्थित झाले नसल्याचे निदर्शनास आले. यावरून या खरीप हंगामाच्या काळातही तालुका कृषी विभाग किती सजग आणि कर्तव्यदक्ष आहे, हे दिसून आले. आहे.
कार्यालय १०.०९ वाजतापर्यंत बंदस्थानिक तहसील कार्यालयातील प्रशासकीय इमारतीमध्ये असलेले तालुका कृषी अधिकारी कार्यालय सकाळी १० वाजून १० मिनिटापर्यंत कुलूपबंद होते. कार्यालयाचे दार उघडले नव्हते . शासनाने कर्मचाऱ्यांना पाच दिवसाचा आठवडा केला त्यानुसार त्यांच्या वेळात बदल करून सकाळी ९:४५ ते सायंकाळी ६:१५ वाजेपर्यंत कर्मचारी कार्यालयात उपस्थित असणे बंधनकारक केले तरीसुद्धा कार्यालयाच्या वेळात हे कर्मचारी येत नसल्याचे दिसून आले आहे. या कार्यालयात अधिकारी व कर्मचारी यांची काही महत्वाची पदे रिक्त आहेत तालुक्याच्या कृषी विभागाचा डोलारा इतर कर्मचाऱ्यांवर असून शासनाने कृषी कार्यालयातील पदे त्वरित भरावी अशी मागणी सुद्धा शेतकरी वर्गांकडून केली जात आहे . सध्या शेतकऱ्यांच्या शेती पिकाचा खरीप हंगाम असून हंगामात तालुक्यातील शेतकऱ्यांना पिकांचे नियोजन व रोग नियंत्रणाची माहिती देण्यासोबतच शासनाच्या विविध योजना राबविण्यासाठी या कार्यालयाने पुढाकार घेण्याची गरज आहे. पण, येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांची अनास्था ही समजण्यापलीकडे आहे. येथील तालुका कृषी कार्यालयातील कृषी अधिकारी यांची बदली झाल्याने येथील कृषी कार्यालयाचा पदभार कळंब येथील तालुका कृषी अधिकारी यांना देण्यात आला त्यामुळे येथील कार्यालयातील कृषी विभागाची घडी विस्कटलेली दिसून येत आहे. येथील कार्यालयातील मुख्य अधिकारीच असल्याने वेळेचे बंधन पाळण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. विशेष म्हणजे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असतानाही तालुका कृषी अधिकारी, कृषी सहायक व कारकून आदी कर्मचारी यवतमाळ येथून ये-जा करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाºयांच्या या मनमर्जी कारभारामुळे शेतकऱ्यांच्या समस्या बोकाळल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. तरी वरिष्ठ अधिकाºयांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील या बिनधास्तपणाला आवर घालण्याची गरज निर्माण झाली आहे.
