
सहसंपादक : रामभाऊ भोयर
दि. २६ जुलै २०२५
भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने “एक पेड मा के नाम” हा पर्यावरणपूरक उपक्रम सोनामाता हायस्कूल, चहांद येथे उत्साहात व यशस्वीपणे राबविण्यात आला. निसर्गाचा समतोल राखणे आणि विद्यार्थ्यांमध्ये वृक्षारोपणाची जाण व आवड निर्माण करणे, या उद्देशाने या उपक्रमात आवळा, पिंपळ, उंबर, बेहडा, चिंच व कडुलिंब यासारख्या स्थानिक उपयुक्त झाडांची रोपे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आली.विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांना आपल्या मातेसोबत झाडे लावून त्याचा फोटो “एक पेड मा के नाम” या लिंकवर अपलोड करायचा होता. या अभिनव उपक्रमात सर्वच विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत झाडे आपल्या घरी, शेतात, बांधावर, मंदिर परिसरात व शाळेच्या आवारात लावली.
या उपक्रमाबद्दल बोलताना मुख्याध्यापक श्री. अनिल धोबे सर म्हणाले, “निसर्गाचा समतोल राखण्यासाठी ही भावी पिढी मोठी भूमिका बजावेल, अशी आशा आहे.” शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व झाडांची व्यवस्था करून उपक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.या उपक्रमामुळे भविष्यात प्रदूषण कमी होऊन स्वच्छ पर्यावरणासाठी उपयोगी ठरणारी घनदाट झाडे उभी राहतील, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला. सर्वांचे सहकार्य आणि पर्यावरणाबद्दलची जाणीव उपक्रमाच्या यशस्वीतेमागे ठळक ठरली.
