
राळेगाव तालुक्यातील वाढोणा बाजार प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवारी (दि. १८ ऑगस्ट) रात्री आठच्या सुमारास लागलेल्या आगीत औषधी विभागातील महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सदर आरोग्य केंद्र हे नेहमीच वादग्रस्त ठरत असून, याआधीही २३ जून २०२५ रोजी अशाच प्रकारे औषधी विभागाशी संबंधित कागदपत्रे जळून खाक झाली होती. याची तक्रार संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती; मात्र यावर काहीही कारवाई न झाल्यामुळे पुन्हा एकदा आग लागण्यामागे संशयास्पद बाबी समोर येत असून, ही आग लागली की लावण्यात आली, याबाबत चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे या प्रकरणी कठोर चौकशी व कारवाई होणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कपाटात ठेवलेली औषधी विभागाची महत्त्वाची कागदपत्रे आगीत पूर्णतः जळाली. आग लागल्याचे समजताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन विझविण्याचे प्रयत्न केले. त्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले व आग आटोक्यात आणण्यात आली. घटनेची माहिती मिळताच वडकी पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुखदेव भोरखडे, जमादार दीपक वाँडरसवार व पोलीस अंमलदार निरंजन खिरटकार यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास वडकी पोलिसांकडून सुरू आहे.
