
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील खैरी ग्रामपंचायत मध्ये महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामसभा दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. ग्रामसभेला ग्रामस्थ, शेतकरी, महिला बचतगट सदस्य युवक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.या ग्रामसभेचे अध्यक्षस्थान ग्रामपंचायत सरपंच श्रीकांत राऊत यांनी भूषविले. यात मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, या अभियानाच्या माध्यमातून गावात लोकसहभागातून विकासाला गती मिळणार असून प्रत्येक ग्रामस्थाने यात सक्रिय सहभाग नोंदवावा.या प्रसंगी विशेष अतिथी म्हणून व्ही एन टोपलमोडे (स्थापत्य सहाय्यक अभियांत्रिकी राळेगाव) हे उपस्थित होते .
ग्रामसभेत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान प्रमुख घटकाबद्दल सविस्तर माहिती ग्रामपंचायत अधिकारी जयश्री पाटील मॅडम यांनी दिली. यात
सुशासनयुक्त पंचायत ,सक्षम पंचायत (स्वनिधी व लोकवर्गणी), जलसमृद्धी, स्वच्छ व हरित गाव, मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण गावपातळीवरील संस्था सक्षमीकरण,उपजीविका विकास व रोजगार निर्मिती, गृहनिर्माण व सामाजिक न्याय ,लोकसहभाग व श्रमदानातून लोकचळवळ उभारणी,नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणे अशी माहिती देऊन या घटकांची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास खैरी हे गाव ग्रामविकासाच्या दिशेने मोठी झेप घेईल, असे ग्राम पंचायत अधिकारी जयश्री पाटील मॅडम यांनी सांगितले.
सेवा पंधरवडा आणि योजनांचा लाभ
ग्रामसभेत सेवा पंधरवडा या उपक्रमाची माहिती देण्यात आली. या कालावधीत शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना थेट ग्रामस्थांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत. तसेच पांदण रस्त्यांच्या विकासावर विशेष भर देऊन शेतकऱ्यांना शेतीसाठी सोयीस्कर मार्ग उपलब्ध करून देण्यावर चर्चा झाली.
ग्रामसभेत पाणीपुरवठा, स्वच्छता, शैक्षणिक सुविधा, अंगणवाडी, रस्ते विकास, शेतीविषयक योजना, महिला बचतगटांचे बळकटीकरण तसेच रोजगाराभिमुख उपक्रमांवर चर्चा झाली. ग्रामसभेत गावाकऱ्यांनी तसेच महिलांनी ग्रामविकासात सक्रिय सहभाग घेतला तरखैरी हे गाव विकासात उंच शिखर गाठेल अशी संकल्पना सरपंच श्रीकांत राऊत व सचिव जयश्री पाटील मॅडम मांडली.
ग्रामसभेच्या शेवटी ग्रामपंचायत अधिकारी जयश्री पाटील मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानून सांगितले की,
“गावाचा सर्वांगीण विकास हा लोकसहभागातूनच शक्य आहे तेव्हा गाव विकासासाठी सर्व गावकऱ्यांनी लोकसहभाग वाढवावा व ग्रामविकासासाठी सहकार्य करावे”. तेव्हा महिलांचा जास्त पुढाकार असलेल्या या ग्रामसभेमध्ये सर्वांनी एकत्र येऊन गाव विकासाची नवीन दिशा निश्चित करून गावाचा विकास करण्याचा संकल्प व्यक्त केला. यावेळी या ग्रामसभेला ग्रामपंचायतीचे सदस्य प्रमोद बोडे, रमाताई बनकर, लता पवार, पोलीस पाटील राजेंद्र भेदुरकर, दोन्ही जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री सुरेश कुंभलकर, संदीप आडे तसेच खैरी गावातील संपूर्ण बचत गटांच्या सर्व महिला आवर्जून उपस्थित होत्या तसेच ग्रामसभा यशस्वी करण्याकरिता खैरी ग्रामपंचायतचे सरपंच, सचिव व ग्रामपंचायत चे सर्व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
