
सहसंपादक : रामभाऊ भोयर
भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंती महोत्सवानिमित्त संस्कृती संवर्धन विद्यालय, राळेगाव येथे जनजातीय पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले. हा पंधरवडा विविध सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांनी उत्साहात संपन्न झाला.
या पंधरवड्याच्या अंतर्गत शालेय स्तरावर रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वारली पेंटिंग, वकृत्व स्पर्धा तसेच आदिवासी नृत्य स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. समारोप सोहळ्यात स्नेहभोजनाचेही आयोजन करण्यात आले असून सर्व विद्यार्थ्यांनी या भोजनाचा मनापासून आनंद घेतला.
समारोप कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक श्री.दिनकर आय.उघडे यांनी भूषविले, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री.देवेंद्र मून उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान श्री. देवेंद्र मून सर यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या ब्रिटिशांविरुद्धच्या संघर्षाची आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या कार्याची माहिती दिली. त्यांनी बिरसा मुंडा यांनी दिलेल्या प्रेरणादायी घोषणामागील अर्थ विद्यार्थ्यांना समजावून सांगितला.
अध्यक्षीय मनोगतात शाळेचे मुख्याध्यापक श्री.दिनकर उघडे यांनी आदिवासी समाज हा भारताचा खरा नायक असून “जल, जंगल आणि जमीन” यांचे संरक्षण करण्याचे कार्य आदिवासी समाजाने हजारो वर्षांपासून करत आल्याचे सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना या परंपरेबद्दल आदरभाव ठेवण्याचे आणि आदिवासी संस्कृती जपण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन कु. सलमा कुरेशी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कु.ज्ञानेश्वरी आत्राम, श्री.राकेश नक्षिणे, श्री.योगेश मिटकर, कु. भाग्यश्री काळे आणि सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
