

सहसंपादक : रामभाऊ भोयर
मोहदा ते सराठी रस्त्यावर झोटिंगधारा गावाजवळ झालेल्या एका भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून, दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. या दुःखद घटनेत मोहदा येथे एका कार्यक्रमासाठी आपल्या नातेवाईकांच्या घरी आलेले अशोक माणिक आत्राम (वय ४५) रा. शिरोली ता. घाटंजी यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. रस्त्याच्या वळणावर वाढलेली झाडेझुडपे हेच या अपघाताचे मुख्य कारण असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
कार्यक्रमासाठी आले आणि काळाने गाठले
मिळालेल्या माहितीनुसार, अशोक आत्राम हे मोहदा येथे एका कार्यक्रमानिमित्त आपल्या नातेवाईकांच्या घरी आले होते. काळाला हे मंजूर नव्हते, आणि रविवार दुपारी ते आपल्या दुचाकीने (क्र. MH 29 BY 2088) मोहद्याकडे येत होते. त्याचवेळी, सराठीकडे प्रवासी घेऊन जाणारा ऑटो (क्र. MH 29 M 3258) विरुद्ध दिशेने येत होता.
झोटिंगधारा गावाजवळ असणाऱ्या एका धोकादायक वळणावर दोन्ही वाहनांची समोरासमोर भीषण धडक झाली. धडक इतकी जोरदार होती की, दुचाकीस्वार अशोक आत्राम यांना जागीच प्राण गमवावे लागले.
दोन महिला गंभीर जखमी; इतरांची प्रकृती स्थिर
या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाले, तर ऑटोमधील दोन महिला प्रवासी गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने, ऑटोचालक आणि इतर पॅसेंजर्स यांना किरकोळ जखमा झाल्या असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
रस्त्यावरील वाढलेले गवत आणि झाडे अपघातास कारणीभूत
या भीषण अपघाताची माहिती मिळताच पोलीस पाटील पियुष गबराणी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनेची माहिती त्वरित पांढरकवडा पोलीस स्टेशनला दिली. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताचे मुख्य कारण रस्त्याच्या वळणावर वाढलेली झाडे आणि झुडपे आहेत. या वाढलेल्या झाडझुडपांमुळे वळणावर समोरून येणारे वाहन चालकांना स्पष्टपणे दिसत नाही, ज्यामुळे अशा प्रकारचे अपघात घडत आहेत.या घटनेनंतर, पोलिसांनी तातडीने पंचनामा सुरू केला आहे. या अपघाताचा तपास पांढरकवडा पोलीस स्टेशनचे PSI नितीन सुशीर करत असून, शिपाई राजू सर हे त्यांना सहकार्य करत आहेत. वाढलेल्या झाडझुडपांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
