
सहसंपादक : – रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील एकलारा गावातील तरुण शेतकरी उमेश आनंदराव उईके (वय 42) यांनी शनिवारी सकाळी कथितरित्या आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली. सततची नापिकी, वाढत गेलेले कर्ज आणि भविष्यातील आर्थिक अनिश्चितता यामुळे ते मानसिक तणावात असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
उईके यांच्या नावावर सुमारे 4 एकर शेती असून त्यांच्याकडे स्टेट बँकेचे कर्ज असल्याची माहिती मिळाली आहे. मागील काही हंगामांतील नापिकीमुळे शेतीखर्च भागवणे कठीण झाले होते. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, हे मोठे संकट त्यांच्यासमोर उभे राहिले होते.
मृतकांच्या मागे म्हातारे आई-वडील, पत्नी आणि दोन लहान मुले असा परिवार आहे. कुटुंबाचा कर्ता पुरुष अचानक निघून गेल्यानंतर कुटुंब आर्थिक संकटात ढकलले गेले असून शासनाने तातडीने आर्थिक सहाय्य द्यावे, अशी मागणी गावकऱ्यांसह कुटुंबीयांकडून होत आहे.
स्थानिक पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
