
सहसंपादक : रामभाऊ भोयर
सण म्हणजे आनंद, पण तो आनंद वंचितांपर्यंत पोहोचवला तरच सणाला खरा अर्थ प्राप्त होतो, हे दाखवून दिले आहे अंगणवाडी सेविका चंद्रकला गणेश पानसे (बर्डे) यांनी.दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी आपल्या कुटुंबियांसह पारधी समाजातील बेड्याशेजारील वस्तीवर जाऊन ‘सार्थ दिवाळी’ साजरी केली. या उपक्रमात पारधी समाजातील कुटुंबीय, मुले आणि महिलांना फराळ, मिठाई, कपडे, शालेय साहित्य आणि दिवाळी भेटवस्तू वाटण्यात आल्या.या उपक्रमामुळे त्या वस्तीवर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. लहान मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद, महिलांच्या डोळ्यातील कृतज्ञतेचा भाव आणि समाजातील ऐक्याचे दर्शन हे या ‘सार्थ दिवाळी’चे खरे यश ठरले.
चंद्रकला बर्डे यांनी सांगितले —
“सणासुदीचा आनंद सर्वांसोबत वाटला कीच त्याचा अर्थ पूर्ण होतो. आपल्या छोट्याशा प्रयत्नातून जर एखाद्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं, तर तीच खरी दिवाळी आहे.”
त्यांच्या या सामाजिक कार्याचे गावातील नागरिक, पालक व सहकारी अंगणवाडी सेविका यांनी मनःपूर्वक कौतुक केले.
पानसे कुटुंबियांनी अनेक वर्षांपासून गोरगरीब, आदिवासी आणि वंचित घटकांमध्ये सणासुदीला सेवा, मदत आणि आनंद वाटपाचे उपक्रम राबवून समाजापुढे एक प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे.
हा ‘सार्थ दिवाळी’ उपक्रम ग्रामीण समाजात एकतेचा आणि संवेदनशीलतेचा संदेश देणारा ठरला असून,
चंद्रकला गणेश पानसे (बर्डे) आणि त्यांच्या कुटुंबियांचा हा उपक्रम खऱ्या अर्थाने मानवतेचा उत्सव म्हणता येईल.पारधी वस्तीवरील दिवाळी साजरीचा आनंद लुटताना चंद्रकला बर्डे व पानसे कुटुंबियांसह ग्रामस्थ.
