
सहसंपादक ::रामभाऊ भोयर
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करताना राळेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत रावेरीने गावच्या विकासाचा आणखी एक मोलाचा टप्पा गाठला आहे. गावातील पाणलोट क्षेत्र मजबूत करण्यासाठी, जलसंधारण वाढवण्यासाठी तसेच भविष्यातील पाण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थांच्या श्रमदान व लोकसहभागातून एक भक्कम ‘वनराई बंधारा’ तयार करण्यात आला.*
या उपक्रमातून रावेरी ग्रामस्थांची एकजूट, स्वावलंबन आणि विकासाविषयीची सकारात्मक बांधिलकी स्पष्टपणे दिसून आली.
वनराई बंधाऱ्याचे काम सकाळी लवकर गावातील स्वयंसेवकांच्या उपस्थितीत सुरू झाले. गावातील तरुणाई, , ज्येष्ठ नागरिक, शेतकरी बांधव अशा सर्व स्तरांतील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने श्रमदानात भाग घेतला. गावाने स्वतःहून पुढाकार घेऊन आपल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन करण्याचा धाडसी निर्णय घेतल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या उपक्रमात ग्रामपंचायत रावेरी येथील ग्राम स्वच्छता अभियान समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तसेच ग्रामपंचायत अधिकारी यांची उपस्थिती उल्लेखनीय होती. ग्रामपंचायतीच्या नेतृत्वाने या बंधाऱ्यामुळे गावातील पाणी साठवण क्षमता वाढेल, शेतीसाठी जलपुरवठा सुकर होईल आणि भूजल पातळीमध्ये लक्षणीय वाढ होईल असा विश्वास व्यक्त केला.
ग्रामस्थांनी मिळून पाण्याचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी वनराई बंधारा तयार करून पाणी संवर्धनाच्या या उपक्रमात आपला हातभार लावला.
वनराई बंधाऱ्याच्या निर्मितीमुळे येणाऱ्या काळात गावात हिरवाई वाढेल, शेतकऱ्यांच्या सिंचनाची अडचण दूर होईल आणि जलस्रोतांचे पुनरुज्जीवन होईल, असा ग्रामस्थांचा विश्वास आहे. ग्रामपंचायत रावेरीने पुढील काळात गावाच्या विकासासाठी जलसंधारण, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनासंबंधित आणखी अनेक उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त केला आहे.रावेरी ग्रामस्थांच्या श्रमदानातून झालेले हे काम ग्रामविकासाची खरी ओळख ठरत असून अन्य गावांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण करणारे असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
