
तहसीलदारांसह नगरपंचायत कार्यालयावर धडक,
प्रशासनाकडे सामूहिक निवेदन
सहसंपादक : रामभाऊ भोयर
कळंब: रासा रोडवरील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे बांधकाम त्वरित बंद करा अथवा, आम्ही या प्रकल्पाचे काम बंद पाडू, असा धमकीवजा इशारा रासा रोडवरील नागरिकांसह, शासकीय सेवेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नगरपंचायतला आज मंगळवारी निवेदनाच्या माध्यमातून दिलेला आहे. सदर प्रकल्पाविरोधात कळंबबासी आक्रमक झाले आहे.कळंब नगरपंचायतच्या माध्यमातून रासा रोडवरील बीपीएड महाविद्यालयाजवळ एका प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. हा प्रकल्प नेमका कशाचा याबाबत अनेक तर्कवितर्क लढविले जात आहे. दरम्यान, नागरिकांच्या माहितीप्रमाणे इथे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरू होत आहे. त्यामुळे या प्रकल्पाला नागरिकांनी त्याला तीव्र विरोध दर्शवीला आहे. भविष्यात या प्रकल्पाचे नागरिकांच्या आरोग्यावर मोठे दुष्परिणाम होईल, असे नागरिकांचे म्हणने आहे. कळंब शहरात एकही मोठे मैदान नाही, शासकीय सेवेची
तयारी करणाऱ्या तरुणासह नागरिकांना सकाळ-संध्याकाळ फिरण्याकरिता व्यवस्था नाही. माजी शालेय शिक्षण मंत्र्यानी कळंबला सुसज्ज मैदानाचे
दिवास्वप्न दाखवले होते, मात्र त्यांचा लाल दिवा जाताच त्यांनी कळंब शहराला चॉकलेट दिल्याची जणमाणसात चर्चा आहे. कळंब शहरात आता धावण्यासासाठी,व्यायामासाठी रासा रोडशिवाय पर्याय शिल्लक राहिलेला आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यासाठी ही बीपीएड महाविद्यालयाचे एकमेव मैदान उपलब्ध आहे. मात्र आता नगरपंचायत च्या माध्यमातून त्या महाविद्यालयाच्या परिसरात कचरा डेपो उभारण्यात येत असल्याने या भागातील नागरिकांसह, विद्यार्थ्यांचा भ्रमनिरास झालेला आहे. त्यामुळे हा प्रकल्प नेमका कशाचा, याबाबत चा खुलासा करावा, सोबतच कचरा डेपो होत असल्यास त्याचे बांधकाम त्वरित बंद करण्याची मागणी या निवेदनाच्या माध्यमातून नगरपंचायतसह तहसीलदार धीरज स्थूल यांच्याकडे केली आहे.
