

सोनदाभी येथे विद्यार्थ्यांचा शाळाबाह्य ठिय्या; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप
प्रतिनिधी//शेख रमजान
एकीकडे सरकार ‘शिक्षण हक्क’ आणि ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’च्या घोषणा देत असताना, दुसरीकडे मात्र सोनदाभी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना हक्काच्या शिक्षकासाठी चक्क रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. गेल्या ९ जानेवारीपासून शिक्षक मागणीसाठी विद्यार्थ्यांनी शाळेवर बहिष्कार टाकला असून, आज १२ जानेवारी रोजी राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती चक्क उघड्या मैदानात एका झाडाखाली साजरी करण्यात आली.
प्रशासनाचा संतापजनक कानाडोळा
सोनदाभी येथील शाळेत शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यासंदर्भात ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शिक्षणाधिकारी, तालुका शिक्षणाधिकारी तसेच स्थानिक आमदारांनाही वारंवार निवेदने दिली. मात्र, लोकशाही मार्गाने मागणी करूनही अद्याप प्रशासनाने किंवा लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिलेले नाही.
शिक्षकाच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी गेल्या चार दिवसांपासून शाळेला टाळे ठोकले आहे. आज जिजाऊ जयंती आणि युवा दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी पालकांच्या आणि गावकऱ्यांच्या उपस्थितीत मोकळ्या मैदानात शाळा भरवली. यावेळी महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले, परंतु हक्काचे शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्टपणे दिसत होती.
९ जानेवारीपासून आंदोलन सुरू असून आज १२ तारीख उजाडली, तरीही एकाही जबाबदार शिक्षणाधिकाऱ्याने शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्याची तसदी घेतली नाही. “प्रशासनाच्या या आडमुठ्या धोरणामुळे आमच्या मुलांचे भविष्य अंधारात आहे, लोकशाहीत ही अत्यंत खेदजनक बाब आहे,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
जोपर्यंत शाळेला हक्काचे शिक्षक मिळत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा पवित्रा सोनदाभीच्या ग्रामस्थांनी आणि विद्यार्थ्यांनी घेतला आहे. आता प्रशासन याकडे लक्ष देऊन शिक्षकांची नियुक्ती करते की विद्यार्थ्यांचा हा वनवास असाच सुरू राहतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
