
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील वरुड जहांगीर हे पेसा अंतर्गत येणारे हे गाव राळेगाव येथून दहा किलोमीटरच्या अंतरावर आहे त्यामुळे या वरूडवासियांना झाडगाव हेच गाव प्रत्येक कामासाठी जवळ म्हणजे तीन किलोमीटर अंतरावर असल्यामुळे जवळ पडते.या गावात अंगणवाडी ते उच्च प्राथमिक शिक्षण पर्यंतच शिक्षणाची सोय असल्याने पुढील शिक्षणासाठी अनेक वर्षांपासून मुले मुली झाडगावला नियमित जाणे येणे करतात.यामध्ये काही विद्यार्थी पायदळ तर काही विद्यार्थी सायकलने तर काही विद्यार्थी आपापल्या सोयीनुसार वाहनाने जाणे येणे करतात. सोबतच या गावातील शेतकरी शेतमजूर व इतर लोकांना आपल्या बॅंकेच्या कामासाठी झाडगावलाच जावं लागतं सोबतच शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आँनलाईन करण्यासाठी सुध्दा झाडगावलाच जावं लागतं त्यामुळे या गावाला झाडगाव हे गाव किती महत्त्वाचे आहे हे सांगायची गरज नाही.अशातच या झाडगाव वरुड जहांगीर हा रस्ता बऱ्यापैकी दुरूस्त होता तो पर्यंत कुठलीही काळजी नव्हती.सोबतच शासनाने प्रत्येक रस्त्यावर मैलकुली नियुक्त केले असल्याने त्या रस्त्यावर असलेले दगड वेचणे,खड्यावर माती भरणे रस्त्याच्या कडेला वाढलेला वाढलेली झाडं झुडपं तोडण्याची कामे नियमित आणि सुरळीत चालू होती.मात्र आता या रस्त्यावर कुठल्याही प्रकारचे मैलकुली नसल्याने या रस्त्यावर असलेल्या कामासाठी कोणतीही व्यवस्था केली नाही त्यामुळे आता वाटसरूना अनेक संकटांचा सामना करावा लागतो.आता सध्या या रस्त्याची कामे, दुरूस्ती जिल्हा परिषदेच्या निधीतून चालत असल्यामुळे प्रत्येक कामाची जबाबदारी अधिकारी बंधूवर आहे आणि अशातच या रस्त्याने विद्यार्थी आता जाणे येणे करायला घाबरतात कारण या रस्त्यावर दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात झाडं झुडपे वाढून असल्याने जंगली जनावरं वगैरे असण्याची भिती या विद्यार्थ्यांना वाटायला लागली आहे.या बाबतीत संबंधित विभागाला जागं करण्यासाठी मागील काही दिवसांपूर्वी वृत्तपत्रात बातम्या प्रसिद्ध केल्या परंतु त्या बातम्यांचा या विभागाला फारसा फरक पडला नाही आणि आम्हाला एका अधिकाऱ्याने सांगितले की नगरपरिषद आचारसंहिता लागू असल्याने या कामासाठी लागणारा निधी उपलब्ध करून घेता येत नाही.मात्र आता आचारसंहिता संपली मात्र अजूनही या कामाकडे कुठल्याही अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित केले नसून हा विषय गांभीर्याने घेऊन ताबडतोब या रस्त्याची साफसफाई करून या विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना, शेतमजूराना,वाटसरूना दिलासा द्यावा अशी मागणी वरूड जहांगीर येथील रहिवासी तथा खरेदी विक्री संघाचे संचालक श्रावणसिंग वडते सर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
