
विघ्नहर्ता गणेश मंडळातर्फे मोर्चेकऱ्यांच्या चोख व्यवस्था; पुंडलिक टेकाम यांचा पुढाकार
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
अतिमागास कोलाम समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पांढरकवडा येथून निघालेल्या ऐतिहासिक ‘पायदळ लॉंग मार्च’चे मोहदा नगरीत मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यात आले. २० मार्च २०२६ रोजी निघालेला हा मोर्चा २१ मार्च रोजी दुपारी मोहदा येथे दाखल झाला. यावेळी संपूर्ण गाव कोलाम समाजबांधवांच्या हक्काच्या घोषणांनी दुमदुमून गेले होते.
मोहदा येथे आलेल्या मोर्चेकऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी स्थानिक विघ्नहर्ता गणेश मंडळ, झोटिंगधरा यांनी पुढाकार घेतला. मंडळाच्या वतीने मोर्चेकऱ्यांसाठी थांबण्याची, नास्ता आणि चहा ची अत्यंत शिस्तबद्ध व्यवस्था करण्यात आली होती. या संपूर्ण नियोजनाचे नेतृत्व पुंडलिक टेकाम यांनी केले. रणरणत्या उन्हात मैलोन्मैल चालत आलेल्या समाजबांधवांना या व्यवस्थेमुळे मोठा आधार मिळाला.
मोर्चेकऱ्यांचे स्वागत करताना मोहदाचे सरपंच अक्षय मेश्राम म्हणाले की, “कोलाम समाज हा निसर्गाशी नातं सांगणारा आणि अत्यंत प्रामाणिक समाज आहे. मात्र, आजही हा समाज मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. त्यांच्या न्याय्य हक्कासाठी काढण्यात आलेल्या या लॉंग मार्चला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. मोहदा ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ या आंदोलनात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. सरकारने या समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करू नये.”
आयोजक पुंडलिक टेकाम यांचे मनोगत:यावेळी पुंडलिक टेकाम यांनी आपली भूमिका मांडताना सांगितले की, “आपल्या हक्कासाठी घराबाहेर पडलेल्या समाजबांधवांची सेवा करणे हे आमचे कर्तव्य आहे. विघ्नहर्ता गणेश मंडळाच्या माध्यमातून आम्ही केवळ सोय केली नाही, तर या लढ्यात आम्हीही त्यांच्यासोबत आहोत हा संदेश दिला आहे. कोलाम समाजाच्या व्यथा सरकारपर्यंत पोहोचाव्यात आणि त्यांना न्याय मिळावा, हीच आमची भावना आहे.”
आंदोलनाचा पुढील टप्पा:
हा मोर्चा प्रदेशाध्यक्षा इंदिरा बोंदरे, युवा नेते अतुल आत्राम आणि राहुल चिच्चघाटे यांच्या नेतृत्वाखाली यवतमाळच्या दिशेने कूच करत आहे. मोहदा येथील सभेत बोलताना नेत्यांनी ‘शामदादा कोलाम स्वतंत्र अभ्यास आयोग’ तातडीने स्थापन करण्याची आणि सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार देण्याची मागणी लावून धरली. हा मोर्चा आता यवतमाळ येथे पालकमंत्री संजय राठोड यांच्या निवासस्थानावर धडकणार असून, निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.यावेळी कुंदन कुडमथे,मोरेश्वर गायकवाड रुंझा बिट जमदार दरांडे, कमलेश काकडे, पोलीस पाटील पियुष गबराणी आणि मोठ्या संख्येने कोलाम समाजबांधव, महिला व युवक उपस्थित होते.
