
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
कळंब तालुक्या अंतर्गत येत असलेल्या शंकरपूर येथे”गावे वाचली पाहिजेत, ती समृद्ध झाली पाहिजेत,” हा ध्यास घेऊन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांतून प्रेरणा घेत, शंकरपूर येथे २१ आणि २२ मार्च २०२६ रोजी ‘गुरुदेव ग्राम संरक्षण दल’ निर्माण शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. गावागावात वाढत चाललेली जातीयता, अंधश्रद्धा आणि राजकीय गटबाजी यावर मात करून युवकांचे संघटन बांधणे, हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता.
संस्कारिक संरक्षणासाठी ‘दोन वेड्या योद्ध्यांची’ संकल्पना
ग्रामगीतेतील “संघटन हेचि शक्तीचे सूत्र” या मंत्राला अनुसरून श्री. विनोदभाऊ देवतळे आणि श्री. नामदेवभाऊ वाढई या दोन सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून हे अभियान राबवले जात आहे. युवकांना प्रशिक्षित करून त्यांना निर्व्यसनी, रोजगारीत आणि सुसंस्कारित बनवणे ही या मोहिमेची ‘पंचतत्वे’ (संस्कार, सेवा, संघटन, सद्धर्म आणि संघटन) आहेत.
शिबिरातील ठळक वैशिष्ट्ये:
या शिबिरात विविध गावांतील ४० युवक सहभागी झाले होते.
केवळ व्याख्याने न देता ‘प्रत्यक्ष कृतीतून’ रचनात्मक कार्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
सकाळ-संध्याकाळ गावात डफडी भजन आणि जनजागृती रॅली काढण्यात आली.
सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून ग्रामविकासाचा संदेश देण्यात आला.
लोकसहभागातून (फुल नाही फुलाची पाकळी) अत्यंत कमी खर्चात हे ‘कम मे बम’ शिबिर यशस्वी करण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती:
शिबिराचे उद्घाटन २१ मार्च रोजी प्रमुख उपस्थिती मा. श्री. विलासराव भोयर यांच्या हस्ते व मा. प्राचार्य सावरकर सर यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी सुनील भोयर सर, नरेंद्र कोटजावळे, पुरुषोत्तम नैताम, विलास बाहाळे, गंगाधरराव घोटेकर व शामराव वलके उपस्थित होते.
याप्रसंगी राज्याचे माजी शिक्षण मंत्री प्रा. वसंत पुरके, ॲड. सीमा तेलंगे, ग्रामगीताचार्य रूपेश रेगे, प्रा. अनिल दौलतकर, प्रा. विशाल दौलतकर यांनी युवकांना मार्गदर्शन केले. समारोपीय कार्यक्रमाला प्रा. घनश्याम दरणे व श्री. बिट्टूभाऊ जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
नियोजन आणि आभार:
या शिबिराचे नेटके नियोजन युवा कार्यकर्ते नितीन भोयर आणि अनुताई भोयर , मोनिका ताई कोटजावळे या दांपत्याने समस्त गावकऱ्यांच्या सहकार्याने केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय कोटजावळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन विनोदभाऊ देवतळे यांनी केले. किशोर बाभुळकर, प्रा. पंकज आत्राम व नरेश राऊत यांचे विशेष सहकार्य लाभले.
राष्ट्रसंतांच्या ‘सपना का भारत’ साकारण्यासाठी प्रत्येक गावात अशा शिबिरांची गरज असल्याचे मत यावेळी गावकऱ्यांनी व्यक्त केले.
