
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
शासनाच्या घरकुल योजनेअंतर्गत सुरू असलेली बांधकामे सध्या रेतीच्या तीव्र तुटवड्यामुळे ठप्प झाली असून लाभार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तहसील कार्यालयामार्फत काही रेती घाट उपलब्ध करून देण्यात आले असले तरी हे घाट परिसरापासून लांब असल्याने प्रत्यक्षात रेती मिळवणे लाभार्थ्यांसाठी कठीण ठरत आहे.वाढोणा बाजार, वेडशी, आठमूर्डी, पिंपळगाव, करंजी, येवती, चहांद, परसोडा, धानोरा, वाठोडा, वानोजा, चिखली, अंतरगाव या गावांतील अनेक घरकुल लाभार्थ्यांची बांधकामे अर्धवट अवस्थेत थांबली आहेत. रेतीचा पुरवठा खंडित झाल्यामुळे बांधकामाचा वेग मंदावला असून काही ठिकाणी काम पूर्णपणे बंद पडले आहे.
लाभार्थ्यांचे म्हणणे आहे की, सध्या उपलब्ध करून दिलेले रेती घाट दूर अंतरावर असल्याने वाहतूक खर्च वाढत आहे तसेच वेळेचा अपव्यय होत आहे. त्यामुळे घरकुल योजना वेळेत पूर्ण करणे कठीण होत आहे.या पार्श्वभूमीवर, परिसरालगत असलेल्या रोहिणी, हिरापूर, येवती किंवा मुधापूर येथील रेती घाटातून स्थानिक पातळीवर रेती साठा उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरत आहे. असे केल्यास वाहतूक सुलभ होऊन कमी दरात रेती मिळू शकते व घरकुल बांधकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा लाभार्थ्यांनी व्यक्त केली आहे.
प्रशासनाने तातडीने लक्ष घालून स्थानिक स्तरावर रेती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
घरकुल योजनेअंतर्गत स्वतःचे घर उभारण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लाभार्थ्यांसाठी रेतीचा तुटवडा ही अत्यंत गंभीर समस्या बनली आहे. बांधकामे अर्धवट अवस्थेत थांबणे म्हणजे आर्थिक तसेच मानसिक त्रास सहन करावा लागतो. प्रशासनाने केवळ घाट उपलब्ध करून देणे पुरेसे नसून ते स्थानिक व सोयीस्कर असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे परिसरालगतच्या रेती घाटातून तातडीने साठा उपलब्ध करून देऊन घरकुल कामांना गती द्यावी ही विनंती..
: प्रसाद कृष्णराव ठाकरे
अध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा,राळेगाव तालुका
