
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव : राळेगाव येथील गॅस सिलिंडर वितरण व्यवस्थेमध्ये होत असलेल्या गैरसोयी, नियोजनाचा अभाव तसेच सुरू असलेल्या कथित ब्लॅक मार्केटिंगविरोधात शिवसेना राळेगाव तालुक्याच्या वतीने मा. तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले.निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, गॅस बुकिंग केल्यानंतर OTP उशिरा प्राप्त होणे, OTP मिळाल्यानंतरही सिलिंडर वितरणास विलंब होणे, वितरण केंद्रावर नागरिकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागणे अशा अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. तसेच अनेक वेळा कर्मचारी अनुपस्थित राहतात व उपस्थित कर्मचारी नागरिकांना समाधानकारक माहिती देत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे.
वितरण केंद्रावर पिण्याचे पाणी, सावली, बसण्याची व्यवस्था नसल्याने नागरिकांचे हाल होत असून ज्येष्ठ नागरिक, महिला व दिव्यांग व्यक्तींसाठी कोणतीही स्वतंत्र सुविधा उपलब्ध नसल्याचेही निवेदनात म्हटले आहे. टोकन प्रणाली नसल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होत असल्याचे सांगण्यात आले.यासोबतच काही ठिकाणी गॅस सिलिंडरची ब्लॅक मार्केटिंग होत असून अधिक दराने विक्री केली जात असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचे शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आले.
या सर्व प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच गॅस वितरण व्यवस्था सुरळीत व नियोजनबद्ध करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.तसेच, लवकरात लवकर समस्यांचे निराकरण न झाल्यास जनतेच्या हितासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही शिवसेना राळेगाव तालुक्याच्या वतीने देण्यात आला आहे.
