
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील सावरखेडा येथे सापदंशामुळे एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे. रुपेश नानाजी शेळके (वय ३४) असे मृत युवकाचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, रुपेश शेळके हे दररोजप्रमाणे सकाळच्या वेळी अंघोळ करून घरातील कपाटाजवळ कपडे बदलण्यासाठी गेले होते. त्यावेळी कपाटाखाली दबा धरून बसलेल्या विषारी सापाने अचानक त्यांच्या पायाला दंश केला. सुरुवातीला नेमकं काय झालं हे लक्षात आलं नाही, मात्र काही वेळातच त्यांना अस्वस्थ वाटू लागले व प्रकृती झपाट्याने खालावत गेली.घरातील सदस्यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्याची तयारी केली. मात्र दवाखान्यात नेत असतानाच वाटेत त्यांचा मृत्यू झाला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे शेळके कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.रुपेश शेळके हे गावात सर्वांच्या ओळखीचे व मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांच्या निधनाची बातमी गावात पसरताच सावरखेडा परिसरात शोककळा पसरली. नातेवाईक, मित्रपरिवार तसेच ग्रामस्थांनी शेळके कुटुंबीयांच्या घरी धाव घेत होती तर त्यांच्या पश्चात पत्नी व दोन छोटे छोटे मुलं असा आप्त परिवार असून त्यांच्या निधनाने सावरखेडा सह परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे
