

(प्रतिनिधी) शेख रमजान
ऑनलाईन औषधविक्रीच्या निषेधार्थ मेडिकल असोसिएशनने आज पुकारलेल्या राज्यव्यापी ‘मेडिकल बंद’ आंदोलनावर सामान्य नागरिकांमधून अत्यंत तीव्र आणि संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. “हा बंद खरोखरच ग्राहकांच्या हितासाठी आहे की ग्राहकांना लुटण्यासाठी?” असा थेट आणि रोखठोक सवाल आता त्रस्त ग्राहकांकडून उपस्थित केला जात आहे.एमआरपीच्या (MRP) नावाखाली लूट आणि जेनेरिकची कोंडीबंदच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना अनेक सजग नागरिकांनी औषध विक्रेत्यांच्या मनमानी कारभारावर बोट ठेवले आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, कोणत्याही औषध दुकानात गेले तरी छापील किमतीच्या (MRP) नावाखाली अवाच्या सवा दर वसूल केले जातात. बाजारात स्वस्त जेनेरिक औषधे सहज का उपलब्ध करून दिली जात नाहीत? आणि जर काही ठिकाणी ती उपलब्ध असली, तरीही त्यांच्यावर अवास्तव छापील किंमत टाकून तीच ग्राहकांकडून वसूल केली जाते.बनावट औषधे आणि दरांमधील मोठी तफावतया संपूर्ण प्रक्रियेत ग्राहकांची मोठी आर्थिक फसवणूक होत असल्याचे सांगत नागरिकांनी काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत: औषधांमधील मूळ घटक (Content/Salt) एकच असताना, वेगवेगळ्या कंपन्या त्यांच्या किमतींमध्ये एवढी प्रचंड तफावत का ठेवतात?
सामान्य ग्राहकाने बाजारातील बनावट आणि अस्सल औषधे कशी ओळखायची? याबाबत कोणतीही पारदर्शकता का नाही?डॉक्टर आणि रुग्णालयांच्या ‘कमिशनखोरी’वर बोटग्राहकांनी केवळ औषध दुकानांवरच नव्हे, तर वैद्यकीय क्षेत्रातील साखळीवरही गंभीर आरोप केले आहेत. डॉक्टरांकडून ब्रँडेड औषधांऐवजी स्वस्त जेनेरिक औषधे का लिहून दिली जात नाहीत, असा सवाल नागरिक करत आहेत. अनेक नामांकित रुग्णालयांमध्ये स्वतःची औषध दुकाने असतात. तिथेच विशिष्ट औषधे घेण्याचा आग्रह धरला जातो आणि तिथे अवास्तव किमती आकारून रुग्णांची उघड लूट केली जाते, हे उघड सत्य असल्याचे ग्राहकांनी म्हटले आहे. या सगळ्या परिस्थितीवरून हा बंद फक्त मेडिकल असोसिएशनच्या स्वहितासाठी आणि ग्राहकांची लूट सुरू ठेवण्यासाठीच पुकारला गेला आहे,” असे स्पष्ट मत नागरिकांनी सोशिअल मीडिया वर नोंदविले आहे. औषध खरेदीच्या या संपूर्ण प्रक्रियेत शेवटी ग्राहकच भरडला जात आहे. ऑनलाईन औषधविक्री विरोधातील आंदोलनावर ‘लूटमार’ की ‘हित’? , असा सूर सर्वसामान्यांमधून उमटत आहे.
