अल्पसंख्यांक समाजाचे सामाजिक कार्यकर्ते मिर्झा परवेज बेग यांचे पोलिस निरिक्षकांसोबत शाब्दिक चकमक सुरु असतांना अचानक ह्रदयविकाराच्या धक्क्याने रात्री निधन

प्रतिनिधी:सलीम शेख,हिंगणघाट


हिंगणघाट दि.०७ हिंगणघाट येथील अल्पसंख्यांक समाजाचे सामाजिक कार्यकर्ते मिर्झा परवेज बेग यांचे पोलिस निरिक्षकांसोबत शाब्दिक चकमक सुरु असतांना अचानक ह्रदयविकाराच्या धक्क्याने रात्री निधन झाल्याने परीसरात खळबळ माजली असुन शहरात तणावपुर्ण शांतता आहे.
दिनांक ६ च्या रात्री १० वाजता ही दुर्दैव घटना घडली असुन दरम्यान र्मिर्झा परवेझ बेग यांच्या मृत्युला प्रथमदर्शनी कारणीभुत धरुन हिंगणघाटचे पोलिस निरिक्षक भानुदास पिदुरकर याचेवर चौकशी बसविण्यात आलेली असुन सहायक पोलिस उप निरिक्षक आरीफ फारुकी याला तात्काळ निलंबित करण्यात आलेले आहे.या घटणेने शहर हादरले असतांनाच रात्रीपासुनच शहरात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला असुन तणावपुर्ण शांतता आहे.
मिळालेल्या माहिती नुसार अवघ्या ३१ दिवसांपुर्वी ठाणेदार म्हणुन रुजु झालेले पोलिस निरिक्षक भानुदास पिदुरकर व सहायक पोलिस उप निरिक्षक आरिफ फारुकी हे रात्रीच्या गस्तीवर होते.परिसरातील दुकाने बंद करीत रात्री १० च्या सुमारास ते आंबेडकर चौकाच्या बाजुला असलेल्या केजीएन हॉल समोर पोहचले.या हॉलच्या दुसर्‍या मजल्यावर मिर्झा परवेझ बेग यांचे हॉटेल लजिज आहे.ते हॉटेल सुरु असल्याचे बघुन दोघेही त्या हाॅटेल मध्ये गेले.
मिर्झा परवेझ बेग यांचा छोटा मुलगा मिर्झा शादाब बेग याने दाखल केलेल्या तक्रारी नुसार तो हॉटेल बंद करुन आवराआवर करीत होता.तेथे पिदुरकर व आरिफ फारुकी यांनी आपल्याला अश्लिल शिविगाळ करीत मारहाण केली.आपले पिता मिर्झा परवेझ बेग व मोठा भाऊ मिर्झा हुमायु बेग यांना माहीती मिळाल्यावर ते तडक हॉटेल मध्ये आले.त्यांनाही या दोन्ही पोलिस अधिकार्‍यांनी अपमानजनक भाषा वापरुन मारहान केली.त्याचा आपल्या पित्यावर विपरित परीणाम होउन ते तेथेच कोसळले.त्यांना त्यावेळी मदत करायची सोडुन दोन्ही पोलिस अधिकारी घटणास्थळावरुन पसार झाले असा आरोपही तक्रारदाराने केलेला आहे.पित्याला कोसळलेले बघुन दोन्ही भाऊ घाबरले व त्यांनी मिर्झा परवेझ बेग यांना तातडीने दवाखान्यात नेले असता त्यांना वैद्यकिय अधिकार्‍यांनी मृत घोषित केले.या दुर्दैवी घटणेची माहीती वार्‍यासारखी शहरात पसरली.नागरीकांची पोलिस स्टेशन समोर गर्दी जमली.मृतक मिर्झा परवेझ बेग याचे कनिष्ठ पुत्र मिर्झा शादाब बेग यांनी रात्री एक वाजता हिंगणघाट पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करुन दोन्ही पोलिस अधिकार्‍यांना निलंबित करण्यात यावे व घटनेची चौकशी करुन न्याय मिळण्याची मागणी केली.वाढता तणाव बघता हिंगणघाट शहरात राज्य राखिव दलाच्या तिन तुकड्या,आरसीपी चे ३० जवान तसेच हिंगणघाट,समुद्रपूर,वडणेर,गिरड चे पोलिस कर्मचारी व अधिकारी तसेच वर्धा व पुलगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी यांना बंदोबस्तासाठी पाचारण करण्यात आले.पोलिस अधिक्षकही येथे ठाण मांडुन बसले.
दरम्यान सकाळला उपविभागीय रुग्णालयात शवविच्छेदन गृहात मृतकाला ठेवलेले असतांना तेथे मोठ्या प्रमाणावर जमाव जमला.तेथे रफिक पत्रकार,आफताब खान,राजु तिमांडे,हुमायु मिर्झा बेग,मिर्झा दौलत बेग,शाकिर खान पठाण,ज्वलंत मुन ईत्यादींनी दोषींना कडक शासन करा ही मागणी लाउन धरली.
त्यावेळी निवासी उपविभागिय अधिकारी पियुश जगताप यांनी पोलिस अधिक्षकांनी सहायक पोलिस निरीक्षक आरीफ फारुकी याला निलंबित केल्याचे व पोलिस निरिक्षक भानुदास पिदुरकर यांची उपविभागीय पोलिस अधिकारी स्तरावर चौकशी करुन त्याचा अहवाल लवकरच सादर केल्या जाईल असे जाहीर केले व तणाव निवळला.