

प्रतिनिधी:उमेश पारखी,राजुरा
राजुरा:
ज्या वेळेस सर्व नातेवाईक साथ सोडतात अगदी त्याच वेळेला बाळू त्या व्यक्तीच्या इलाजासाठी कित्येक दवाखाने पालथे घालतो,या कोरोनाच्या महामारीत एखाद्याची रिपोर्ट पॉझिटिव्ह आलीरे आली की इतर लोकांचा त्या व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो,एवढेच काय त्या व्यक्तीच्या परिवारातील लोकही एका वेगळ्या नजरेने पाहायला सुरुवात करतात,ज्यांना रक्ताचे नातेवाईक म्हणतो असेही अशा व्यक्तींची साथ सोडायला लागतात.नातेवाईक म्हणणाऱ्याची वागणूक बदलायला लागते.आज प्रत्येक दवाखाण्यासमोर रुग्णांची आणि त्यांना वाचविण्यासाठी चाललेल्या नातेवाईकांची धडपड आपणास दिसत आहे.
आणि अशा वैफल्यग्रस्त वातावरणात आशेचा किरण जो दिसतो तो असतो बाळू! होय राजुरा तालुक्यातील युवक,जेष्ठ,गरीब,असहाय लोकांचे प्रेरणास्थान नव्हे अत्यंत वाईट परिस्थितीतही लोकांच्या मदतीला धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणजे चुनाळा येथील सरपंच श्री.बाळनाथ जानबाजी वडस्कर!
गेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत अख्या महाराष्ट्रातून दुसऱ्या क्रमांकावर एकाच पॅनलने एक गठ्ठा यश मिळविणारी ग्रामपंचायत होती चुनाळा! बाळनाथच्या पॅनेलने तेरा सदस्य निवडून आणून निवडणुकीत घवघवीत यश प्राप्त केले होते,ग्रामपंचायत ही महिला राखीव निघाली,ग्रामपंचायतमध्ये सात महिला असूनही त्यांनी सरपंचपद नाकारलं,ज्याच्या कार्यशैलीवर विश्वास ठेवून,ज्याच्या कामावर विश्वास ठेवून अख्खी पॅनल विजयी केली त्या बाळनाथसाठी महिलांचा त्याग हा अपेक्षित होता,एवढेच नव्हे तर स्वयंस्फूर्तीने चुनाळा गाववासीयांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला आणि बाळनाथला सरपंच करणार नसेल तर आम्ही दुसऱ्या कोणालाही सरपंच म्हणून होऊ देणार नाही अशी मागणी रेटून धरली.हा मोर्चा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात चर्चेचा विषय ठरला आणि हीच खरी तर बाळूच्या निष्कलंक चारित्र्याची आणि लोकांसाठी समर्पित कामाची पावती होती.
सतत सामान्य गरिबांचे कल्याण व्हावे हे मनात बाळगून त्यांची अहोरात्र सेवा करणारा बाळू कित्येक युवकांचे प्रेरणास्त्रोत आहे,समाजाचे आपण काही देणे लागतो या उदात्त हेतूने समाजातील गरीब,गरजवंतांसाठी वेळेची पर्वा न करता तो रात्रंदिवस झटत असतो.आजच्या कोरोनाकाळात सर्व जण आपापल्या घरी बसून असताना हा व्यक्ती मात्र खाजगी दवाखाने असो की सरकारी दवाखाने असो कुठे ना कुठे एखाद्या रुग्णासोबत आपल्या दृष्टीस पडतोच पडतो.कोरोनाग्रस्त रुग्णात आत्मविश्वास निर्माण करतो,रुग्णाचे नातेवाईक कोणी सोबत नसताना,रुग्णासाठी बेड असो की इतर कोणती समस्या असो तो सोडविण्यासाठी आपले जीवाचे रान एक करतो.एवढेच नाही तर दुर्दैवाने एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्याचे अंतिम संस्कार देखील तो स्वखर्चाने उरकून टाकतो.मध्यंतरी अशा ध्येयवेड्या माणसाला आणि त्याच्या परिवाराला कोरोनाची लागण झाली त्याही स्थितीत या माणसाने न डगमगता कोरोनावर मात केली.आपल्या चांगल्या कामाचे चांगले परिणाम कधी न कधी मिळत असतात हेच यावरून दिसून येते.
बाळू वडस्कर यांच्या सतत लोकांच्या अडीअडचणीला धावून जाण्याच्या स्वभावाने तालुक्यातील तहसीलदार साहेब,वैद्यकिय अधिकारी,गट विकास अधिकारी,ठाणेदार साहेब यांचे भरपूर सहकार्य त्यांना मिळत असते,कोणत्याही कामाचा एक रुपयाही न घेता अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तो सर्वांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करीत असतो. आपल्या पोटच्या मुलासारखे प्रेम ही लोकं करीत असतात.
बाळूचा राजकारणापेक्षा समाजकारणावर जास्त भर असल्याने त्याला समोरचा गरजवंत कोणत्या पक्षाचा आहे याने काही फरक पडत नाही,प्रथम गरजवंत आणि नंतर राजकारण हे त्याच्या आयुष्याचे सूत्र आहे,जनतेनी त्याच्या याच कामामुळे पक्ष बाजूला ठेवत एकमताने निवडून आणले नव्हे जनतेने त्या निमित्त उदंड प्रेम केले, तो स्वतः निवडून येण्याचे आणि तेरा लोकांना निवडून आणण्याचे श्रेय तो कधीच घेताना दिसत नाही,राजकारणापेक्षा त्याला लोकं जवळची वाटतात आणि याच जवळीकतेने लोकांनी बाळूला भरभरून प्रेम दिले.
यश मिळालं की काही लोकं हवेत उडायला लागतात तर काही लोकांना पदाची आणि खुर्चीची नशा चढते पण बाळू या सर्व गोष्टींना अपवाद आहे.आज बाळूमुळे कित्येक लोकांचे प्राण वाचले तर कित्येक लोकांना बाळू आपल्या कुटुंबातला एक घटक वाटतो,तो करत असलेल्या कामाचे श्रेय कोण घेतो याच्याशी काही त्याचे देणेघेणे नसते, लोकांना बाळू काय आहे याची पूर्ण कल्पना आहे आणि त्यामुळेच त्याच्या कामाचे श्रेय कोणी घेण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा तोच बाळू एकच वाक्य म्हणतो “मी कुठे तरी कोणाच्या कामी आलो यापेक्षा मला पुन्हा काही नको,मी समाधानी आहे हीच माझी आत्मसंतुष्टी आहे,कोण काय करतो त्याने मला काही फरक पडत नाही”.
असे अनेक बाळू समाजात निर्माण व्हावेत आणि समाज सुजलाम सुफलाम व्हावा!
