सारथी संशोधकाचा आत्मदहनाचा इशारा,मागण्या मान्य न झाल्यास टाळेबंदीनंतर आत्मदहनाचा इशारा सारथी संशोधक आक्रमक

प्रतिनिधी :परमेश्वर सुर्यवंशी


मराठा व कुणबी समाजातील सारथी संशोधक विद्यार्थ्यांनी आज महाराष्ट्रभर घरी राहून लाक्षणिक एकदिवसीय उपोषण केले. या आंदोलनात महाराष्ट्रातील सप्टेंबर 2019 मध्ये संशोधन फेलोशिप लागू असणारे 502 व मुलाखती होऊन प्रलंबित यादीची वाट पाहणारे 241 विद्यार्थ्यांनी आपल्या घरी राहून या आंदोलनात सहभाग नोंदवला. या आंदोलनापूर्वी विद्यार्थ्यांनी सारथी कार्यालय, खात्याचे मंत्री मा. अजित पवार व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांना आपल्या मागण्या मेल करून कळविल्या होत्या. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे आज लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या उपोषणाला ऑनलाइन बैठकीच्या माध्यमातून शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी उपस्थिती दर्शवली व विद्यार्थ्यांच्या मागण्यांचे निवेदन ऐकून घेतले. विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्या हातात पोस्टर घेऊन मांडण्याचा प्रयत्न केला. यामध्ये प्रामुख्याने संशोधन आधीछात्रवृत्ति बार्टी संस्थेच्या धर्तीवर विद्यापीठातील प्रवेश दिनांकापासून देण्यात यावी, मुलाखत होऊन पात्र असलेल्या 2020 च्या जाहिरातीतील प्रलंबित 241 विद्यार्थ्यांना तात्काळ फेलोशिप देण्यात यावी या मागण्या मांडण्यात आल्या. त्याचबरोबर प्रलंबित घरभाडे भत्ता व आकस्मिक खर्च द्यावा,बार्टी प्रमाणे सारथी संशोधक विद्यार्थ्यांना लॅपटॉप द्यावे, सारथी संस्थेसाठी 1000 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करावी, एम. फिल करणाऱ्या विद्यार्थ्यांना पी.एच.डी. साठी फेल्लोशीप मिळेल हे आश्वासन लेखी स्वरूपात द्यावे व त्यावर कार्यवाही करावी, सारथी मधील कागदावर असणारे इतर उपक्रम तत्काळ राबवण्यात यावेत या इतर मागण्या विद्यार्थ्यांनी मांडल्या आहेत. बार्टी आणि सारथी या दोन्ही संस्था महाराष्ट्र सरकारच्या स्वायत्त संस्था आहेत, बार्टीच्या धर्तीवरच सारथी अंतर्गत संशोधन अधिछात्रवृत्ति देण्यात येते, मात्र सारथीच्या विद्यार्थ्यांना वेगळा नियम लावून हा अन्याय का केला जातोय जातोय? असा प्रश्न यावेळी विद्यार्थ्यांनी उपस्थित केला. टाळेबंदी संपल्यानंतर सारथी कार्यालय पुणे या ठिकाणी आत्मदहन करण्याचा इशारा यापूर्वीच विद्यार्थ्यांनी दिलेला आहे. मराठा समाजाला आरक्षण रद्द झाल्यामुळे मोठा फटका बसलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करून सारथी संस्थेने मराठा व कुणबी समाजाच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करावे व मराठा समाजाला शैक्षणिक व सामाजिक उन्नतीसाठी संजीवनी म्हणून पुढे यावे अशी भावना संशोधक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. तरी सारथी संस्थेने ने त्वरित पावले उचलुन संशोधक विद्यार्थ्यांच्या मागण्या ला न्याय द्यावा असे पुन्हा आज सारथी ला कळवण्यात आले.