राज्यभर परिचरिका संपावर, मागण्या पूर्ण न झाल्याने संप
सहसंपादक:प्रशांत विजय बदकी
नागपूर : करोनाच्या कठीन काळात परिचारिकांनी पूर्ण क्षमतेने रुग्णसेवा दिली. त्यानंतरही शासनाने परिचारिकांच्या विविध न्याय मागण्यांना केराची टोपली दाखवली, असा आरोप करीत विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने बुधवारी कामबंद आंदोलनाची घोषणा केली आहे. मेडिकल- मेयोतील बऱ्याच परिचारिका संपावर राहणार असल्याने येथील रुग्णांचा जीव टांगणीला असल्याचे चित्र आहे. परंतु रुग्णालय प्रशासनाने आवश्यक उपाय केल्याने रुग्णसेवेवर कोणताही परिणाम होणार नसल्याचा दावा केला आहे.
आम्ही संप करून रुग्णांना वेठीस धरत नाही. मात्र आमच्या मागण्यांबाबत शासन गंभीर नाही. त्यामुळे आंदोलन करावे लागत आहे. मेडिकलमध्ये एक हजारावर परिचारिका असून यातील ६०० हून अधिक परिचारिका तर मेयोतील चारशेपैकी २०० हून अधिक परिचारिका संपात सहभागी होतील, असे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचे शहजाद बाबा खान म्हणाले. दरम्यान, राज्यात सध्या ३० हजारावर परिचारिका आहेत. त्यांच्या नियोजनाची जबाबदारी एसएनएस यांच्याकडे असून हे पदच रिक्त आहे. राज्यात परिचारिकांच्या दोन वेगवेगळ्या संघटना आहेत. यावेळी एका संघटनेतर्फे बुधवारी आंदोलन पुकारण्यात आले आहे. दुसऱ्या संघटनेने संपात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. यामुळे काही प्रमाणात रुग्णांना दिलासा मिळणार आहे. हा संप सकाळी ८ वाजतापासून होणार असल्याचे आंदोलकांकडून सांगण्यात आले