तणनाशक फवारणीचे नाविन्यपूर्ण जुगाड तणनाशक फवारणीने होणार नाही विपरीत परिणाम


वायगाव भो. दि 30 जुलै: सोयाबीन पिकांमधील तण व्यवस्थापन करण्याकरिता तणनाशकाचा वापर करण्यात येतो. त्या तणनाशकाचा सोयाबीन पिकावर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी वरोरा तालुक्यातील वायगाव भोयर येथील प्रयोगशील शेतकरी सुरेश बापुराव गरमडे यांनी नाविन्यपूर्ण जुगाड करत एका वेगळ्याच पंपछडीची निर्मिती केली आहे.

या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची लागवड केली जाते. या पिकातील तण व्यवस्थापन करण्याकरिता शेतकरी तणनाशकाचा वापर करतात. परंतु तणनाशक फवारल्यानंतर किंवा जास्तीचे प्रमाण झाल्यानंतर त्याचा विपरीत परिणाम सोयाबीन पिकावर होताना दिसून येतो. पिकाची पाने पिवळी होतात. झाडाची वाढ खुंटते. परिणामी फुले आणि शेंगाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे उत्पादनात घट दिसून येते. तणनाशक प्रमाणाबाहेर किंवा अयोग्य वेळेवर फवारणी केली असता संपूर्ण सोयाबीन जळण्याच्या काही घटना घडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान सुद्धा झाले आहे. यावर उपाय म्हणून महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकरी सुरेश गरमडे यांनी एक नाविन्यपूर्ण कल्पना वापरलेली आहे. यामध्ये त्यांनी फवारणी पंपाच्या नळीमध्ये बदल करून तीन नोझलची छडी तयार केली आहे. सोयाबीन पिकावर तणनाशक फवारणी करत असताना या छडीमुळे तणनाशकाचा सोयाबीन पिकाच्या पानांची प्रत्यक्ष संपर्क येत नाही. तर सोयाबीन पिकाखाली असलेल्या तनाशी संपर्क येतो. त्यामुळे फक्त तणाचा नायनाट होतो. या कारणाने तणनाशकाचा सोयाबीन पिकावर विपरीत परिणाम होताना दिसून येत नाही. शिवाय सोयाबीन पिकाच्या खाली लपलेल्या तनावर तणनाशक फवारणी करणे कठीण जाते. तणनाशक तणापर्यंत पोहोचत नसल्यामुळे तण व्यवस्थापन योग्य रीतीने होत नाही. परंतु या छडीमुळे तणनाशकांचा तनावर प्रत्यक्ष संपर्क येतो आणि त्याचा प्रभावी परिणाम होतो. यामुळे सोयाबीन पिकातील तण व्यवस्थापन करणे सोयीचे होते. शिवाय तणनाशक का मुळे सोयाबीन पिकावर होणारे संभाव्य धोके सहज टाळता येतात.