
राळेगांव तालुका प्रतिनिधी :-रामभाऊ भोयर (9529256225)
दरवर्षी तालुक्यातील सेवाव्रतींना दिला जाणारा स्वर्गीय धनजीभाई कारीया स्मृती पुरस्कार यावर्षी डॉक्टर कुणालभाऊ भोयर यांना त्यांच्या आठ वर्षे अविरत रुग्णसेवा दिल्याबद्दल आणि कोरोना काळात अभूतपूर्व सेवा दिल्याबद्दल देण्यात येत आहे. हा पुरस्कार १५ ऑगस्ट ला मान्यवरांच्या हस्ते देण्यात येईल.
राळेगाव तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या सेवाव्रतींना प्रतिवर्षी सत्कार करून आपले समाज ऋण फेडण्याचा छोटासा प्रयत्न म्हणून स्वर्गीय धनजीभाई कारीया यांचे स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचे सुपुत्र भूपेंद्रजी, उमेशजी, संजयजी, भरत यांनी २०११ पासून रुपये पाच हजार शंभर रोख, शाल श्रीफळ, स्मृतिचिन्ह व मानपत्र देऊन सत्कार करण्याचे ठरविले . त्याप्रमाणे यावर्षी २०२१ चा पुरस्कार डॉक्टर कुणालभाऊ बाबाराव भोयर यांना देण्यात येणार आहे. या पुरस्काराची यावर्षीची रक्कम आठ हजार एक रुपये आहे.
वैद्यकीय व्यवसाय हा रुग्णसेवेचा व्यवसाय आहे परंतु हळूहळू त्यामधून सेवा शब्द निघून फक्त व्यवसाय राहिला आहे. परंतु काही डॉक्टर याला अपवाद आहे. आपण २०११ चा पुरस्कार होमिओपॅथीचा व्यवसाय करणारे डॉ. नारायणराव हिवरे यांना दिला होता. ते आजही वीस-तीस रुपये घेऊन औषध देतात. त्याच कडीचे राळेगाव चे डॉक्टर बाबारावजी भोयर हे होते. नुकतेच त्यांचे निधन झाले. त्यांचे सुपुत्र त्यांच्यासोबत रुग्णसेवा करीत होते. पुढे त्यांनी वडिलांचा वसा कायम ठेवून “रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा” हे ब्रीदवाक्य लक्षात ठेवून डॉ. कुणालभाऊ भोयर गेली आठ वर्षे अविरत रुग्ण सेवा करीत आहे.
डॉ. कुणालभाऊ हे आपल्या येथील न्यू इंग्लिश हायस्कूलचे विद्यार्थी होत. त्यांनी बी. ए. एम. एस. महात्मा गांधी आयुर्वेद महाविद्यालय सावंगी मेघे येथून तर एम.डी. राजीव गांधी यूनिवर्सिटी बेंगलोर येथून केले. तेव्हापासून गेली आठ वर्षे ते रुग्णसेवा करतात. मागील दोन वर्षे कोरोना आजाराने जगभर धुमाकूळ घातला आहे. त्यामधून आपला तालुका पण सुटू शकला नाही. या काळात आपल्याला वेगवेगळे अनुभव आले. शासकीय वैद्यकीय सेवा पूर्णपणे कोलमडली होती. खाजगी रुग्णालयात पण बेड मिळत नव्हते त्यामुळे रुग्णाचे खूप हाल झाले. काही महाभाग डॉक्टर सहा फुटावरून हात न लावता रुग्ण तपासत होते हे आपण पाहिले पण कुणालभाऊ भोयर यांनी रूग्णसेवेला वाहून घेतले. रात्रंदिवस एक मिनिटाची उसंत न घेता पैशाची व जीवाची पर्वा न करता रुग्णसेवा करीत आहे त्यामुळे त्यांचे नाव पूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध झाले. अश्या सेवाव्रती डॉ. कुणालभाऊ भोयर यांना २०२१ चा वरील पुरस्कार देण्याचे निवड समितीने एकमताने ठरविले आहे. डॉक्टर कुणालभाऊ भोयर यांना रुग्णसेवा व समाजसेवा करण्याकरिता उदंड आयुष्य लाभो व ईश्वर त्यांना याकरीता अफाट शक्ती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
वरील पुरस्कारा करीता निवड समितीचे अध्यक्ष, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, श्री रविंद्रजी पवार, सदस्य अंकुशराव रामगडे, गंगाधरराव घोटेकार, मेघ:श्यामजी चांदे, पुरूषोत्तमराव मेंडूलकर, एडव्होकेट प्रफुल्लभाऊ चव्हाण, डॉक्टर कैलाशचंदजी वर्मा, युसुफअलीभाई सैयद व भूपेंद्रभाऊ कारीया यांनी एक मताने डॉक्टर कुणालभाऊ भोयर यांची निवड केली आहे.
वरील पुरस्काराची निवड योग्य असल्याची चर्चा जनमानसात आहे. हा पुरस्कार १५ ऑगस्ट २०२१ ला तहसील कार्यालयाच्या प्रांगणात होणाऱ्या ध्वजवंदना नंतर माननीय उपविभागीय अधिकारी यांच्या हस्ते देण्यात येईल असे एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे भूपेंद्रभाऊ कारीया यांनी कळविले आहे.
