
प्रतिनिधी – चेतन एस. चौधरी
नंदुरबार शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रं. ७५३ ब शेवाळी-नेत्रांग या रस्त्याची खड्डयांनी अक्षरशः चाळण झाली आहे. गुजरात राज्याच्या हद्दीपासून ते नंदुरबार शहरातील या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. दुचाकी, चारचाकी तसेच अवजड वाहनांना सुद्धा वाहन चालविणे जिकरीचे ठरत आहे. बरेच वेळा खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघात सुद्धा घडलेले आहेत.
स्थानिक नागरिकांनी माती टाकून तात्पुरती दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा कुठलाही उपयोग झाला नाही. सदर राष्ट्रीय महामार्ग हा गुजरात मधील औद्योगिक शहरांकडे जाणारा असल्याने अवजड वाहनांची वर्दळ जास्त असते. तसेच केवडिया येथील स्टेचू ऑफ युनिटी ला जाण्यासाठी हा मार्ग जवळ असल्याने पर्यटकांची सुद्धा वाहने जास्त प्रमाणात जा ये करत असतात.
परंतु NHAI (भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण) व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी एकमेकांवर जबाबदारी ढकलल्याने या रस्त्याला कोणी वाली आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी अशी मागणी वाहनधारक, नागरिक यांनी केली आहे.
