
वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या नवीन वागदरा येथील इयत्ता नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून पळवून नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
शहरालगत असलेल्या नवीन वागदरा येथील नवव्या वर्गात शिक्षण घेत असलेली पीडिता आपल्या कुटुंबासह राहते. २ जुलै ला रात्री जेवण करून आतल्या खोलीत आपल्या बहिणीसह झोपली होती. पहाटे पीडितेची आई घरकाम करण्यासाठी उठली आणि खोलीत बघितले असता पीडित मुलगी तिला दिसली नाही. आईने सर्वांकडे विचारपूर केली परंतु मुलीचा थांगपत्ता लागला नाही. तेव्हा कुटुंबीयांनी पोलीस ठाणे गाठून रीतसर तक्रार नोंदवली होती. यात फूस लावून पळवून नेल्याची शंका सुद्धा व्यक्त केली असल्याने पोलिसांनी भा दं वि ३६३ कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. या घटनेचा तपास एपीआय संदीप एकाडे करीत होते. दरम्यान पीडित मुलगी दामले फैल भागात राहत असलेल्या मल्लेश निलकुंटावार या मुलासोबत सोबत असल्याची माहिती मिळाली. मल्लेश सुद्धा घटनेच्या दिवसापासून पसार होता. पोलीस मल्लेश च्या शोधात होते.तो पीडितेला तेलंगणा राज्यात घेऊन गेला होता.शनिवारी पीडित मुलगी दामले फैल भागात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मल्लेश च्या घरात जाऊन तपासणी केली असता अल्पवयीन पीडिता तेथे आढळून आली. एपीआय संदीप एकाडे, एपीआय माया चाटसे आदींनी पीडितेला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता. मल्लेश ने लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याचे सांगितले. पीडित मुलीला ताब्यात घेऊन तपास केला असता अल्पवयीन पीडितेचे लैंगिक शोषण झाल्याची माहिती मिळाली. त्यानुसार मल्लेश विरुद्ध भा दं वि ३७६ व बाल लैंगिक कायदा (पोस्को) ४,६नुसार गुन्हा नोंद करून ठाणेदार शाम सोनटक्के यांचे मार्गदर्शनात एपीआय संदीप एकाडे, एपीआय माया चाटसे व सहकारी मल्लेश चा शोध घेत आहेत.
