निशुल्क प्रशिक्षणाचे आयोजन करून नोंदणी पोर्टलमध्ये दुरूस्ती करा: विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची मागणी

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

                  

वरिष्ठ / निवडश्रेणी निःशुल्क प्रशिक्षण आयोजित करुन प्रसिद्ध नोंदणी पोर्टलमध्ये दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय अध्यक्ष एस.जी. बरडे व सरकार्यवाह एस. जी. अडबाले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड, अप्पर मुख्य सचिव वंदना क्रुष्णा व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक एम.डी. सिंह यांचेकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
राज्यातील शिक्षकांसाठी वरिष्ठ व निवडश्रेणी लागू करण्याकरिता आॅनलाईन प्रशिक्षणासाठी नोंदणी करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व परिषदेतर्फे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार प्रशिक्षणार्थी शिक्षकांकडून प्रती रु. २००० प्रशिक्षण शुल्क आकारण्यात येणार आहे. आजपर्यंत आयोजित या प्रशिक्षणासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात आले नसल्यामुळे शुल्क आकारणे ही बाब शिक्षकांवर आर्थिक भुर्दंड देणारी आहे. त्यामुळे निःशुल्क प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात यावे अशी या निवेदनातून मागणी करण्यात आली आहे.
तसेच यापूर्वी निर्गमित शासन निर्णय दि. २८ नोव्हेंबर २००६ (माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी) व दि. १८ जून २०१३ (प्राथमिक शिक्षकांसाठी) नुसार वरिष्ठ व निवडश्रेणीसाठी शिक्षण सेवक कालावधी ग्राह्य धरण्यात आल्याची स्पष्ट तरतुद करण्यात आली आहे. तसेच विनाअनुदानित सेवाकाळ वरिष्ठ व निवडश्रेणीसाठी ग्राह्य धरण्यात आला असताना प्रशिक्षण परिषदेच्या वतीने विकसित केलेल्या नोंदणी पोर्टलमध्ये हा सेवाकाळ वरिष्ठ व निवडश्रेणीसाठी ग्राह्य धरल्या जात नाही असे विमाशिसंघातर्फे पाठविण्यात आलेल्या लेखी निवेदनात नमूद आहे.
त्यामुळे राज्यातील शिक्षकांसाठी निःशुल्क प्रशिक्षणाचे आयोजन करावे व शिक्षण सेवक कालावधी तसेच विनाअनुदानित शाळेतील सेवाकाळ वरिष्ठ व निवडश्रेणीसाठी ग्राह्य धरण्याबाबत विकसित केलेल्या नोंदणी पोर्टलमध्ये दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय अध्यक्ष एस.जी. बरडे व सरकार्यवाह एस. जी. अडबाले यांनी निवेदनातून केली आहे. या निवेदनाच्या प्रती शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालक यांनाही पाठविण्यात आल्या असल्याचे विमाशिचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष अशफाक खान व जिल्हा कार्यवाह रामकृष्ण जिवतोडे यांनी कळविले असल्याची माहीती यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष श्रावनसिंग वडते सर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्धारे दिली आहे.