
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
महागाव तालुक्यातील तुळशीनगर येथील शेतकरी संजय जानुसिंग राठोड यांनी ३५ एकरातील तुर कापून काढण्यासाठी गंजी मारली होती. मात्र मळणीयंत्र मधून तुर काढण्या आधीच रात्री कोणी तरी तुरीच्या गंजीला आग लावल्याने यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांचे यावर्षी आधीच अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. अशातच तूर या पिकावर शेतकऱ्यांची भिस्त होती. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव मधील तुळशीनगर येथे शेतकऱ्यांच्या शेतातील तुरीच्या गंजीला कोणी तरी अज्ञातांनी आग लावल्याने त्यात तब्बल ८० क्विंटल तूर जाऊन खाक झाली. ही घटना बुधवारीच्या रात्री दरम्यान घडली.
या नुकसानीमूळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी ही आग आटोक्यात आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला मात्र ही तुर संपूर्ण जळून खाक झाली. शासनाने नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे. दोन दिवसांनीच होती मळणी – अधिकचे क्षेत्र असल्याने गेल्या 8 दिवसांपासून कापणीचे काम सुरु होते. शिवाय आता पावसाने उघडीप दिल्याने दोन दिवसांमध्ये यंत्राचे सहायाने ते मळणी करणार होते. गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील बदल आणि अवकाळी यामुळे शेतीकामे रखडली होती. आता कुठे वातावरण निवळले होते. एवढे दिवस निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करीत त्यांनी पिकांची जोपासणा केली पण अज्ञातांनी केलेल्या या घटनेतून राठोड तुरीचे पीक वाचवू शकले नाहीत. तक्रार दाखल, मदतीची अपेक्षा – ही घटना निदर्शनास आल्यानंतर संजय जानुसिंग राठोड यांनी महागाव येथील पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली आहे. या घटनेमुळे हातातोंडाशी आलेला घास हिसकावला गेला आहे. त्यामुळे राठोड यांचे दुहेरी नुकसान झाले असून पोलीसांनी या घटनेतील आरोपींना जेरबंद करण्याची मागणी केली आहे तर नुकसानभरपाई देण्याची मागणी राठोड यांनी केली आहे.
