राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
केंद्र तसेच राज्याचा निधी नसल्याने तालुक्यातील घरकुलांचे कामे रखडली आहेत. नगरपंचायतीच्या माध्यमातून शहरात अनेक घरकुलांचे कामे सुरू आहेत. पण केंद्र तसेच राज्य सरकारने आपल्या वाट्याचा निधी न दिल्याने घरकुलाचे काम रखडले आहे. तेव्हा घरकुलाची कामे अर्धवट असलेल्या घरकुल मालकांवर घरकुलाला निधी द्या हो, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी सरकारची घरकुल योजना आहे. नगरपंचायतीच्या माध्यमातून शहरात १७६ घरकुलांचे कामे प्रगतीपथावर आहेत. घरकुलाला अडीच लाखांचा निधी केंद्र व राज्य सरकारकडून मिळतो. यातील दीड लाखांचा निधी केंद्र सरकार देते तर एक लाखांचा निधी राज्य सरकार देते. या दोन्ही सरकारचा निधी असेल तर घरकुलाचे काम पूर्ण होते. पण, या दोन्ही सरकारने अलीकडच्या काळात निधी न दिल्याने घरकुलाचे काम रखडले आहे. यातील काही घरकुल मालकांना अनुदानाचा पहिला हफ्ता मिळाला तर काहींना दुसरा हफ्ता मिळाला. तिसरा हफ्ता अजूनही एकाही घरकुल मालकाला मिळाला नाही. पूर्ण हफ्ते न मिळाल्याने नागरिकांचे घरकुल अर्धवट आहे. त्यामुळेच घरकुल लाभार्थी केंद्र व राज्य सरकारच्या अनुदानाची वाट पाहत आहे. घरकुलाला पहिला हफ्ता ४० हजारांचा, दुसरा चाळीस हजार, तिसरा वीस हजार, चौथा साठ हजार, पाचवा साठ हजार व सहावा तीस हजार, अशा रितीने अडीच लाखांचे अनुदान बांधकामाच्या विविध टप्प्यावर नगरपंचायतीकडून दिले जाते. पण गेल्या तीन वर्षांपासून केंद्र तसेच राज्य या दोन्ही सरकारने घरकुलाचा मंजूर राहिलेला निधी न दिल्याने घरकुलाचे काम अर्धवट आहे.
राळेगाव तालुक्यातील कामे अर्धवट
तीन वर्षांपासून केंद्र तसेच राज्य या दोन्ही सरकारने घरकुलाचा मंजूर राहिलेला निधी न दिल्याने घरकुलाचे काम अर्धवट आहे. या दोन्ही सरकारने हा निधी त्वरित उपलब्ध करून दिल्यास सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. गरज आहे ती या दोन्ही सरकारने तत्परता दाखविण्याची. नगरपंचायत या संदर्भात संबंधित विभाग तसेच लोकप्रतिनिधीकडेही याबाबत पाठपुरावा करीत आहे. पण, त्यांनाही यात यश मिळाले नाही. त्यामुळेच घरकुलाचा मंजूर निधी दोन्ही सरकारांनी तत्काळ उपलब्ध करून द्या, असे म्हणण्याची वेळ घरकुल मालकांवर आली आहे.
