आजनसरा ते वडनेर रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची होणार चौकशी

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

वर्धा जिल्ह्यातील आजनसरा ते वडनेर चालू असलेल्या सिमेंट रस्त्याची होणार चौकशी
केंद्रीय निधी कार्यक्रम अंतर्गत सन २०१९-२० सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत २४ कोटी रुपये मंजूर झालेल्या सिमेंट रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असून त्याचे क्वालिटी कंट्रोल द्वारे मोजमाप करून चौकशी करण्याबाबत माजी आमदार प्रा.राजूभाऊ तिमांडे यांनी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री ना.नितीनजी गडकरी यांची भेट घेऊन चौकशी करण्यासंबंधी चर्चा केली व निवेदनाद्वारे विनंती केली. त्या विनंतीला मान देत तत्काळ अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधून चौकशी करण्यासंबंधी आदेश दिले.
त्या रोडच्या निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्या संबंधी त्या भागातील नागरिकांनी या कामासंबंधी अधिकाऱ्याकडे अनेकवेळा तक्रारी करून सुद्धा कुठल्याही अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली नाही त्यामुळे गावातील नागरिकांनी माजी आमदार प्रा.राजूभाऊ तिमांडे यांची भेट घेऊन या रोडची संपूर्ण परिस्थिती मांडली त्यामुळे त्यांनी स्वतः त्या रोडची पाहणी केली व पाहणी करतेवेळी निकृष्ट दर्जाचे काम दिसून आल्यामुळे त्यांनी गडकरी यांच्याकडे तक्रार केली आहे.
रस्ते व वाहतूक केंद्रीय मंत्री नितिनजी गडकरी यांनी केंद्रीय निधी अंतर्गत आजनसरा ते वडनेर चौरस्ता हा ०८ किलोमीटरच्या रस्त्यासाठी २४ कोटी रुपये मंजूर केले आहे. वडनेर चौरस्ता ते अजन्सारा हा ०८ किलोमीटरचा रस्ता मागील दोन वर्षापासून संभाव्यगतीने काम सुरू आहे. सिमेंटीकरण करण्यासाठी ०४ पूल व संपूर्ण रस्ता पूर्णपणे उखडला असून एका बाजूला सिमेंटीकरणचे करण्याचे काम चालू आहे. जुन्या उखडलेला रोडवर गिट्टी टाकून रोलरने दबाई चालू असून त्यावर सिमेंटीकरणचे काम सुरू आहे. दोन्ही बाजूने सिमेंटीकरण केलेला रोड कमी दर्जाच्या मटेरियलमुळे फुटला आहे आणि त्या फुटलेला रोडवर सिमेंटच्या काँक्रिटचे दुसरे कोटिंग चढवून तो रोड दाबल्या जात आहे त्यामुळे खालच्या कोटींगच्या ड्रायलिंगच्या कामात निकृष्ट दर्जाचे सिमेंट काँक्रीट केल्या जात आहे. त्याचप्रमाणे केलेल्या कामावर दोन दोन दिवस पाणीसुद्धा टाकल्या जात नाही. अशाप्रकारे २४ कोटी रुपये मंजूर असलेल्या कामाचे निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे.
सिमेंट रस्त्यावर पाणी टाकण्यासाठी काही भागात जाळे तर काही भागात पोते टाकले आहे मात्र त्या आळ्यात पाणी टाकण्यास दुर्लक्ष होत असून अल्पावधीतच निकृष्ट दर्जाचे लक्षणे दिसू लागली आहे. असे झाल्यास हा रोड जास्त दिवस टिकणार नाही.
आजनसरा हे महाराष्ट्रातील खूप मोठे तीर्थक्षेत्र असून भाविक भक्त खूप मोठ्या संख्येने तिथे येतात त्यामुळे या मार्गावर खूप मोठ्या प्रमाणात वाहतुकीची रहदारी सुरू असते. भोजाजी महाराज यांच्या पावन स्पर्शाने अजन्सारा हे गाव पुनीत झाले असून तेथे पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो.
तरी आजनसरा ते वडनेर (चौरस्ता) या कामाचे निकृष्ट दर्जाचे सुरू असलेल्या कामाची क्वालिटी कंट्रोल विभागाद्वारे केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांकडून सर्वकष चौकशी करून उत्तम दर्जाचे काम करून दिलासा द्यावा तसेच हिंगणघाट शहरातील कलोडे मंगल कार्यालय चौक( संविधान) व सरकारी दवाखाना चौक येथे जोडून उड्डाणपुलाचे निर्माण करणे आवश्यक आहे हा रोड नागपूर ते हैदराबाद हायवे नंबर ०७ असून खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक आहे शहरातून जाणारा उड्डाणपूल टप्प्या टप्प्यातून तुटक असल्यामुळे अपघाताची संख्या वाढली असून जिवहानी झाली आहे त्यामुळे त्या ठिकाणी एकजीव उड्डाणपूल बांधण्यात यावा अशी विनंती माजी आमदार प्रा.राजूभाऊ तिमांडे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना.नितीनजी गडकरी यांच्याशी चर्चा करून निवेदनाद्वारे विनंती केली आहे. त्यावेळी माजी सरपंच राजू जवादे, ग्रामपंचायत सदस्य मोरेश्वर शेंडे, पंचायत समिती सदस्य सुशील वरटकर, बाबू बोरकर, ग्रामपंचायत सदस्य राजू देवतळे,महेश ढगे उपस्थित होते.