
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
केळापूर टोलनाक्यावरून गोवंश तस्करीचा कंटेनर जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी कंटेनरचा पाठलाग करून गुरुवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास ४९ रेडे कोंबून तेलंगणात अवैध रीतीने जाणारा कंटेनर येथील टोल बूथजवळ पकडला. यावेळी तीन आरोपींना अटक करण्यात आली.
ट्रक क्रमांक एन.एल.०१ क्यु,०९२१ मध्ये जनावरे कोंबून राष्ट्रीय महामार्ग ४४ वरून तेलंगणा राज्यात जात होती. याची माहिती मिळताच पांढरकवडा पोलिसांनी सापळा रचून केळापूर टोलनाक्यावर कंटेनरची चौकशी केली. यावेळी कंटेनरमधून तब्बल ४९ म्हशीचे पारडे (रेडे) आढळून आले.
याप्रकरणी आरोपी ट्रकचालक तालिब निज्जर मेह रा. राजपूर (जि. नुहू, हरियाणा) त्याचा साथीदार आसिफ एहसान कुरेशी व कासीम अब्दुल गफार दोघेही रा. पुराना कसबा (उत्तर प्रदेश) या तिघांना ताब्यात घेतले. कंटेनरसह ४९ म्हशी (रेडे) असा मिळून २३ लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यातील आरोपीविरोधात विविध कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुढील तपास पांढरकवडा पोलीस करीत आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हेमराज कोळी, पोलीस उपनिरीक्षक नीलेश गायकवाड, राजू मोहुर्ले, सिद्धार्थ कांबळे, प्रकाश भगत यांनी केली.
