कर्नाटक एम्टा कोळसा खाणीत होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे बरांज (मो.) गावातील घरे क्षतिग्रस्त नुकसान भरपाई व पुनर्वसनाची मागणी

चैतन्य कोहळे भद्रावती :


कर्नाटक एम्टा कंपनीच्या खुल्या कोळसा खाणीत होणाऱ्या ब्लास्टींगमुळे लागूनच असलेल्या बरांज (मो.) या गावातील पडलेल्या घराची नुकसान भरपाई मिळवून देण्यात यावी, व गावाचे पुनर्वसन करावे अशी मागणी पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना तालुक्यातील बरांज (मो.) येथील रहिवासी सुभाष शिवराम बाळपणे व इतर गावकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
कर्नाटक एम्टा कंपनीच्या ब्लास्टिंगमुळे (दि.५) रोजी सायंकाळी ४ वाजताच्या दरम्यान सुभाष शिवराम बाळपणे यांचे घर कोसळले होते. राहत्या घराची पडझड झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे व त्या घरामध्ये राहण्यास धोका निर्माण झाला आहे. ब्लास्टिंगमुळे घराला भेगा पडलेल्या आहे. हीच परिस्थिती गावातील अनेक घरांची आहे. अनेक घरे ही कोसळण्याच्या स्थितीत आहेत. शाळेतील मुलांना सुध्दा धोका निर्माण झाला आहे.
घराची नुकसान भरपाई देवून गावातील पुनर्वसनाचे काम झपाट्याने करण्यात यावे, अन्यथा कोणतीही मनुष्य हानी झाल्यास शासन व प्रशासन जिम्मेदार राहिल, असे पत्रात नमूद आहे.
यावेळी अशोक निखाडे, साधना बालपणे, यशोदा निखाडे, विनोद देव, वासुदेव निमकर, संभा आत्राम, दिलीप बुरडकर, प्रभाकर मत्ते, विजय कोरडे, संदीप दडमल आदी होते.