
पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या वेदनेला माणुसकीचा होकार…!
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर (9529256225)
दि.१८ जुलै २०२२ ला आलेला महापूर तसेच संततधार मुसळधार पावसामुळे आलेला महापूर आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे झालेले नुकसान तथा हानीमुळे संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक व शेतकऱ्यांची खूप मोठी हानी झाली. अनेक पूरपिडीत गावांना हलविण्यात आले, उभे पीक नेस्तनाबूत झालेले पाहून एक संवेदनशील असलेल्या जि. प. उच्च प्राथमिक शाळा धानोरा पं. स. राळेगाव येथून शिक्षकी पैशाची कारकीर्द सुरू करणारे सहाय्यक शिक्षक सुभाष मोतीराम केराम यांनी जुलै पेड ईन२०२२ ऑगस्ट २०२२ च्या मिळणाऱ्या पगारातून २० हजार रुपये पुराग्रस्त तथा शेतकऱ्यांच्या मदतीला देण्याचे पत्र मा. गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती शिक्षण विभाग मारेगाव येथे देऊन समाजात मानवतेचा संदेश कृतीतून निर्माण केला आहे, सध्या मुसळधार पाऊस आणि महापूर यामुळे राज्यातील शेतकरी अस्मानी,सुलतानी संकटात सापडला आहे.परंतू या जगाच्या पोशिंद्याच्या मदतीला अजून ठोस पणे कोणीही समोर आले नाही. राज्य शासनाने मदत देण्याचे आश्वासन दिले आहे, परंतू वडकी ता. राळेगाव येथील मुळ रहिवासी असलेले सध्या मारेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जळका पं. स. मारेगाव या शाळेचे संवेदनशील शिक्षक सुभाष मोतीराम केराम यांनी दरमहा वेतन काढणाऱ्या पं.स.च्या शिक्षण विभागाला पत्र देऊन जुलैच्या पगारातून २० हजार रुपये पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करावे अशी विनंती केली आहे, विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देत असतानाच कृतीतून आदर्श निर्माण करणाऱ्या सुभाष मोतीराम केराम या मानवतावादी शिक्षकांचे संपूर्ण राळेगाव तालुक्यात कौतुक तर होत आहेच सोबतच अभिनंदन व भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहे, विशेष म्हणजे दिनांक २४/०१/२००५ ला जि. प. उच्च प्राथमिक शाळा किन्ही जवादे ता. राळेगाव येथे कार्यरत असताना सुभाष मोतीराम केराम यांनी सेन्ट्रल बॅंक ऑफ इंडिया शाखा वडकी मार्फत ५०००रु.(पाच हजार रुपये) त्सुनामी काळात पंतप्रधान सहायता निधीत जमा केलेले आहे.कोरोना काळात अनेक कोरोना ग्रस्त रूग्णाला स्वतःच्या फोर व्हीलर गाडीने रूग्णालयापर्यंत पोहचवण्यात मदत केली तसेच सर्व सोई सुविधा बंद असल्या कारणाने बाहेरगावाहून कोरोना बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस बांधवांची घरून चाय व नास्त्याची संपूर्ण काळ सेवा दिली तसेच गावात भटकणाऱ्या पागल व्यक्तींना घरून जेवनाची व्यवस्था केली.विशेष म्हणजे इतरांच्या अडचणीत स्वतःहून मदत करण्याची सेवाभावी वृत्ती असलेले पण प्रसिद्ध पासून दूर असलेले आमचे आदरणीय गुरूजी सुभाष मोतीराम केराम.
