अवैध दारू बंदीसाठी महिलांची राळेगाव पोलिस स्टेशनला धडक

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर

यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या व पोलीस स्टेशन जवळून अवघ्या पाच किलो मीटर अंतरावर असणाऱ्या वारा येथील महिलानी गावातली अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी राळेगाव पोलिस स्टेशनला धडक दिली व गावातली अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी निवेदन दिले. वारा गावात अनेक महिन्यांपासून अवैध दारू विक्री सुरू आहे व याबाबत अनेकदा राळेगाव पोलिस स्टेशनला माहिती देण्यात आली होती परंतु पोलिस फक्त थातुर माथूर कार्यवाही करत होते कारण अवैध दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीकडून मोठ्या प्रमाणात पोलिसांना आर्थिक रसद पुरवली जात होती अशी माहिती महिलांनी दिली. पोळ्या सारख्या सणाच्या दिवशी महिलांना अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी पोलिस स्टेशनला यावे लागते म्हणजे राळेगाव पोलिस स्टेशनचा कारभार किती बोगस आहे हे यावरून लक्षात येथे राळेगाव पोलिस स्टेशन अंतर्गत अनेक गावात अवैध दारू विक्री सुरू आहे परंतु कार्यवाही करण्यात येत नाही याचे एकमेव कारण म्हणजे महिण्याकाठी पोलिस स्टेशनला मिळणारी आर्थिक रसद असल्याची माहिती समोर येत आहे.