शेतक-यांच्या प्रश्नांवर सरकारने संवेदनशील असावे :- किशोर तिवारी

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर

विदर्भ तसेच मराठवाड्यातील शेतक-यांचे प्रश्न गंभीर आहे. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकारने संवेदनशील असणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन चे अध्यक्ष किशोरभाऊ तिवारी यांनी केले. ते यवतमाळ येथे पत्रकार परीषदेत बोलत होते. दरम्यान शेतक-यांच्या प्रश्नांना घेऊन येत्या 13 सप्टेंबरला महाराष्ट्राचे राज्यपाल महोदय तसेच मुख्यमंत्री यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगीतले.

अतिवृष्टी व नापिकीमुळे विक्रमी आत्महत्या सत्र सुरु आहे. विदर्भात मागील दहा दिवसात २० शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. यामध्ये एकट्या यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यात ७ शतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. त्यांची यादी सरकारला सादर केली आहे. शेतकऱ्यांच्या पाठोपाठ त्यांचे कुटुंबीय सुद्धा आत्महत्या करीत आहेत. सततची नापीकी, निसर्गाचा प्रकोप, लागवडी खर्चात वाढ याव्यतिरीक्त आरोग्य, शिक्षण, वीजबिल यामध्ये झालेली प्रचंड वाढ सुध्दा आत्महत्यांना कारणीभूत ठरत आहे. दीलेल्या कर्जमाफीत वंचित शेतकऱ्यांच्या होत असलेल्या यातना, अपुरे पीककर्ज, मायक्रोफायनान्स कंपन्यांची राजरोसपणे चाललेली लुट यामुळे ग्रामीण विदर्भात जगणे कठीण झाले आहे. राज्यातील सध्याच्या महामारीचा तसेच राजकीय परिस्थितीचा फायदा सर्व स्तरावरील अधिकारी घेत असुन उदासीनतेने कळस गाठला असल्याचे चित्र आहे. आजपर्यंत सर्वात जास्त आत्महत्या २००६ मध्ये १२३१ झाल्या होत्या. मात्र २०२२ मध्ये हाच आत्महत्यांचा आकडा जर असाच वाढत राहीला तर ही संख्या १५०० च्या वर जाण्याची भीती किशोर तिवारी यांनी व्यक्त केली. शेतक-यांना कर्ज देण्यास बॅंका टाळाटाळ करतात. शेतक-यांचा सिबील स्कोर बघितल्या जात आहे. पिकविमा कंपण्या सरकारी धोरणाच्या विरुध्द निर्णय घेतात. कर्जमाफी मध्ये अनेकांची नावे सुटली मात्र ती नावे समाविष्ट करण्यात आली नाही. राजकीय अस्थिरतेमुळे आंधळ दळते आणि कुत्र पिठ खाते अशी अवस्था झाल्याची खंत सुध्दा किशोर तिवारी यांनी व्यक्त केली. सरकारला सोपविला कार्यक्रम विदर्भातील आत्महत्या रोखण्यासाठी “पंचसुत्री एकात्मिक शेतकरी वाचवा कार्यक्रम ” शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी तयार केला आहे. हा कार्यक्रम मुख्यमंत्री कडे सादर करण्यात आला आहे. याव्यतिरीक्त राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन त्यांना शेतक-यांच्या व्यथा सांगणार असल्याचे किशोर तिवारी यांनी सांगीतले.