मनोरुग्ण वर्गमित्राला दिला मदतीचा हात,पावणेदोन लाखाची मदत गोळा करत उपचारासाठी रवाना

    

लोकशिक्षण संस्थेच्या लोकमान्य विद्यालयातील सन १९८४-८५ इयत्ता दहावीच्या बॕचने तब्बल छत्तीस वर्षानंतर दिनांक २० मार्च २०२२ ला वरोरा येथिल प्रतिष्ठीत आलिशान सभागृहात गेटटुगेदर चे आयोजन केले होते . आपले जास्तीत जास्त वर्गमित्र जोडता यावेत यासाठी छत्तीस वर्षांअगोदरच्या मित्रांचा शोध घेणे सुरु झाले . हा शोध घेत असतांना जवळपास बारा वर्गमित्र आज आपल्यात नाहीत असे लक्षात आले . १३६ च्या बॕचमधून सद्ध्या मुंबई , पुणे , बंगलोर , कर्नाटक , भारतात सर्वदूर पसलेले , काही विदेशात गेलेले व स्थानिक असे एकूण ८३ विद्यार्थी या गेटटुगेदरला एकत्र आले होते . इतक्या वर्षांनंतर एकमेकांना भेटतांना ओसंडून वाहणारा आनंद प्रत्येकाच्या चेह-यावर स्पष्टपणे जाणवत होता . पण एका गोष्टीची रुखरुख सगळ्यांना होती ती ही की आपलाच एक वर्गमित्र गेल्या तीस वर्षांपासून या वरो-यातच मनोरुग्णावस्थेत भटकत आहे . त्याच्यासाठी आपल्याला काही करता येईल तर निश्चितपणे करायचे हा निर्धार सगळ्यांनी केला आणि आम्ही अशा मनोरुग्णांसाठी कार्य करणा-या संस्थांचा शोध घेणे सुरु केले आणि सेवा संस्थान प्रतिष्ठानात पोहचल्यावर आमचे शोधकार्य संपन्न झाले .
मिळालेल्या माहितीनुसार ” सेवा संकल्प प्रतिष्ठान ” पालसखेड सपकाळ , चिखली , बुलढाणा येथिल डाॕ. नंदकुमार ज्ञानेश्वर पालवे व त्यांच्या पत्नी सौ आरती नंदकुमार पालवे यांच्या सेवा संकल्प प्रतिष्ठानाला व यवतमाळ येथिल संदीप शिंदे यांनी सुरु केलेल्या नंदादीप फाॕन्डेशन ला भेट देऊन माहिती मिळविली . मुकेश पारख , संजय पांम्पट्टीवार , अनिल भडगरे व गोपाळ गुडधे आम्ही सगळ्यांनी आपल्या 1984-85 बॕचच्या वतीने या दोन्ही संस्थांना प्रत्यक्ष भेट देऊन या संस्थांच्या कार्याची पाहणी करुन आपल्या वर्गमित्रासाठी काय योग्य होइल याची सर्वोपांग विचारपूस केली . मनोरुग्ण मित्राच्या कुटुंबियांची प्रत्यक्ष भेट घेऊन राजूच्या या परिस्थितीसाठी नेमकी कोणती गोष्ट कारणीभूत झाली ? त्याला या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी यापूर्वी काही प्रयत्न झाले होते का ? याबद्दल माहिती घेतली . वर्गमित्र म्हणून त्याच्यासाठी आम्ही काही प्रयत्न केले तर कुटुंबियांची काय भूमिका राहिल याविषयी चर्चा करण्यात आली तेव्हा कुटुंबियांनी ही गोष्ट स्वागत योग्यच आहे असे सांगितले . वर्गमित्र म्हणून तुम्ही काही करायच ठरवलं असेल तर संपूर्ण कुटूंबिय आपल्या सोबत राहील व सर्वप्रकारे मदतही करेल असे सांगण्यात आले .

सर्व वर्गमित्रांशी चर्चा करुन पालसखेड सपकाळ तालुका चिखली , बुलढाणा येथे मित्राला भरती करण्याचे ठरले . त्यासाठी आवश्यक असणा-या पोलिस संमती पत्र , कुटुंबियांचे संमती पत्र इत्यादी कागदपत्रे तयार करुन आम्ही डाॕ पालवे यांच्याशी संपर्क साधला . संस्थेला वर्गमित्रांकडून काही मदत करता यावी म्हणून आव्हान केले आणि पहाता पहाता एक मोठी रक्कम गोळा झाली . 14 आॕक्टोबरला वरोरा येथे एका समारंभात डाॕक्टर पालवेंचे सासरे संभाजी काळे , चंदू जोशी , मयुर आणि गौरव या सेवा संकल्प टीमकडे सुपूर्त करण्यात आला . याचवेळी दिलिप बोरा व त्यांच्या सौभाग्यवती यांनी संस्थेला एक इंपोर्टेट व्हिल चेअर भेट दिली . सर्व वर्गमित्रांनी राजू बरा झाल्यानंतर त्याच्या पुनर्वसनाचीही जबाबदारी स्विकारण्याचे ठरविले आहे . वर्गमित्रांपैकी यावेळी डाॕ. जगदीश वैद्य , संजय पांम्पट्टीवार , मुकेश पारख , गोपाळ गुडधे , दिपक तडस , मोहन चट्टे , महेश डोंगरे , गुलाब बदकी , मनिष गोलेच्छा , डाॕ प्रमोद खिरटकर , विजय चतुरकर , महेश काळे , अरुण तडस , अविनाश जोगी , विकास फलोदीया , अजय गुप्ता , गोपाल वरुडकर , सुरेश बरडे , प्रदीप डाखोरे उपस्थित होते . दि. 15 आॕक्टोबरला सकाळी 6-30 वाजता सेवा संकल्प प्रतिष्ठान च्या टीम कडे राजू ला सुपूर्त करण्यात आले . तीस वर्षांनंतर राजूची ही दिवाळी एका प्रसन्न वातावरणात संपन्न होवो ही सदीच्छा सर्व वर्गमित्रांनी व्यक्त केली .