अरेच्चा… पोलिसांना आली “चोराची” दया..! गावकऱ्यांनी पकडले आणि पोलिसांनी चोराला दिले सोडून…

मानकी येथे मध्यरात्री चोराला पकडून गावकऱ्यांनी दिले होते पोलिसांच्या ताब्यात

वणी :

वणी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मौजा माणकी येथे शुक्रवारी मध्यरात्री एका घरात चोरीच्या उद्देशाने दाखल झालेल्या चोरट्याला पकडण्यात आले होते.
दरम्यान वणी पोलीसांना याबाबत माहिती दिली होती. माहिती मिळताच पोलिस अवघ्या १५ मिनिटांत मानकी गावात पोहोचले. यावेळी दोराने बांधून ठेवलेल्या चोराला गावकऱ्यांनी पोलिसांच्या स्वाधीन केले होते. चोराला पकडल्याने आता गावातील झालेल्या चोरीचा पर्दाफाश होईल! एकाला पकडण्यात आल्याने आता त्याच्या साथीदारांची माहिती मिळेल? अशी चर्चा सुरू असतानाच मध्यरात्री पकडण्यात आलेल्या चोरट्याला पोलिसांनी सकाळी सोडून दिल्याची माहिती मिळाली.
वणी शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात घरफोडी,चोरीच्या घटना घडत आहेत, काही दिवसांपूर्वी मानकी येथे एकाच रात्री चार घरी घरफोडी झाली होती. त्यावेळी एका घरातुन अडीच लाखाचे सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्यांनी हात साफ केले होते. मात्र अजुन पर्यंत त्या चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले नाही.
दरम्यान आज शुक्रवारी दि. १८ नोव्हेंबर ला मध्यरात्री अडीच वाजताचे सुमारास मानकी गावातील राजु वाढई यांच्या घरात एक चोर घुसला सर्वप्रथम त्याला समोर मोबाईल दिसताच त्याने तो मोबाईल खिशात घातला हे दृश्य राजु पहात होता यावेळी राजुने घराचा दरवाजा बंद करून दोन्ही हाताने चोरट्याला पकडले. दरम्यान चोरट्याने राजुच्या छातीवर दोन्ही हाताने मारु लागला, झटापट सुरू झाल्यामुळे राजुचे दोन्ही मुले शुभम, गणेश व त्याची पत्नी जागी झाले व तात्काळ चोराला पकडले. यावेळी आरडाओरड सुरू झाल्याने शेजारचे लोक धावत आले. दरम्यान चोर पकडल्याची माहिती तंटामुक्त समितीचे अध्यक्ष परशुराम पोटे व पोलिस पाटील मिनाक्षी मिलमीले यांना दिली. तंटामुक्त समिती अध्यक्ष परशुराम पोटे यांनी घटनेची शहानिशा करून वणी पोलिसांना माहिती दिली. दरम्यान या घटनेची माहिती गावात पसरताच गावातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
दरम्यान मध्यरात्री ३:२० वाजता वणी पोलीस घटनास्थळी पोहोचले यावेळी गावकऱ्यांनी चोरट्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.
शुक्रवारी सकाळी वणी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन रात्री पकडण्यात आलेल्या चोराबद्दल विचारपूस केली असता पोलिसांनी त्या इसमाची चौकशी करून सोडुन दिल्याची माहिती मिळाली. यावेळी अधिक माहिती घेतली असता पोलिस म्हणाले की, तो ईसम राजस्थानी असुन कामानिमित्त फिरत होता. रात्री एका ट्रक मधून मानकी परिसरात उतरला आणि रात्र असल्याने तो मानकी गावात आला असावा, असे सांगितले. परंतु तो चोर नाही तर मध्यरात्री २:३० वाजताचे सुमारास एका घरात शिरला कसा? तसेच घरातील मोबाईल चोरुन खिशात घातला कसा? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले असून या आधी गावातील एकाच रात्री चार घरफोडी झाली होती त्यावेळी एका घरातुन अडीच लाखाचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले होते. त्या घटनेचा अजुन पर्यंत तपास का लागलेला नाही? असा प्रश्न विचारला जात आहे. मात्र या प्रश्नाचे उत्तर पोलीसांना कधी देता येईल हे सांगणे कठीण झाले आहे.