गाव नमुना आठ अभावी भंगणार घरकुलाचे स्वप्न,टेम्भेश्वर नगर वासियांचा प्रश्नही वाऱ्यावरच.

ढाणकी प्रतिनिधी -प्रवीण जोशी.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असलेला ड्रीम पोजेक्ट म्हणजे देशातील सर्व नागरिकांना पक्के घर असावे. या साठी त्यांनी प्रधानमंत्री घरकुल योजना सुरु केली.

या योजनेचा शुभारंभ नुकताच ढाणकी शहरात सुद्धा सुरु झाला असून नागरिकांची घरकुलसाठी कागदाची जुळवाजुळव करण्याची घाई सुरु झाली. मात्र कागद पत्राची जुळवा जुळव करताना नागरिकांची चांगलीच दमछाक होत आहे.घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी जागेचा गाव नमुना आठ आवश्यक असून गावठाणतील अनेक नागरिकांजवळ आठ अ नसल्याने त्यांना घरकुला पासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. अनेक नागरिकांजवळ तर जागेचे जुने दस्तएवज नसल्याने आठ फेरफार साठी सुद्धा अडचण येत आहे.

ढाणकी नगरपंचायत काळात साध्या संमती पत्र आणि वाटणी पत्रवर जागेचा आठ अ फेर फार होत असे मात्र आता नगरपंचायत आठ अ चा फेरफार करण्यासाठी निबंधक कार्यालयातून नोंदणी करून मगच आठ अ चा फेरफार करत असल्याने नागरिकांसमोर मोठी खर्चिक बाब उभी राहत आहे. आधी नगरपंचायत चा जागेचा  कर भरायचा आणि नंतर निबंधक कार्यलयातून वाटणी पत्र करायचे ही मोठी खर्चिक बाब असून सामान्य गरीब नागरिकांजवळ एवढा पैसा असता तर ते कशाला घरकुलच्या मागे लागले असते? हा मोठा प्रश्न आहे. नगरपंचायत च्या या अश्या धोरणामुळे आज शहरातील गरजू नागरिकांना या घरकुल योजनेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. ज्याप्रमाणे ग्रामपंचायत काळात स्टॅम्प पेपर वर गावनमुना आठ चा फेरफार ग्रामपंचायत करून देत होती त्या प्रमाणे नगरपंचायत ने सुद्धा  पूर्वी सारखे वाटणी पत्र आणि संमती पत्रावर गावठाण जागेचा फेरफार आठ अ करून देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

चौकट –

घरकुला संदर्भात टेम्भेश्वर नगर वासियांचा प्रश्न देखील वाऱ्यावर असून अद्याप त्यांना त्यांच्या नावाचा  पण आठ दिल्या गेला नाही. टेम्भेश्वर वासी राहत असलेले जागा ही शासनाची असून या जागेचा आठ अ आम्ही त्या जागेवर राहत असलेल्या नागरिकांना फेरफार करून देऊ अशी ग्वाही निवडणुकीच्या वेळी नेते मंडळी नी दिली होती. आता मात्र या विषयावर कोणीही बोलायला तयार नाही. घरकुलाची खरी गरज टेम्भेश्वर नगर वासियांना असून त्यांच्यावर सुद्धा आठ अ अभावी घरकुला पासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.

प्रतिक्रिया –
याबाबत मी वरिष्ठसोबत चर्चा करिन आणि नियमात बसत असेल तर नक्कीच आम्ही आठ अ देण्याचा प्रयत्न करू. गरजूना घरकुल मिळाले पाहिजे हाच आमचा प्रयत्न आहे. घरकुलापासून कोणीही वंचित राहणार नाही.

महेशकुमार जामनोर
मुख्याध्याकारी, नगरपंचायत ढाणकी.