
प्रतिनिधी : चंद्रपूर दिनांक २४ राज्यातील अतिदुर्बल व वंचित, आदिवासी विद्यार्थ्यांना कौशल्याभिमुख करून त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देणाऱ्या व्यवसाय शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी राज्यातील हजारो व्यवसाय शिक्षक नागपूर हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी धडक महामोर्चा काढणार असल्याचे पत्रक राज्याध्यक्ष शोभराज खोंडे यांनी काढले आहे.
राज्यात समग्र शिक्षा अंतर्गत व्यवसाय शिक्षण योजना राबविण्यात येत आहे. सदर योजनेची अंमलबजावणी व सनियंत्रणाची जवाबदारी असलेल्या समग्र कार्यालयामार्फत हि योजना शासनामार्फत पूर्णपणे अंमलबजावणी न करता महाराष्ट्रद्वेशी राज्याबाहेरच्या विविध खाजगी कंपन्या व त्रयस्थ संस्था यांच्या मार्फत कंपन्यांना निव्वळ नफा कमविण्याच्या उद्देशाने राबवण्यात येत आहेत, याचा परिणाम राज्यातील गरीब, अतिदुर्बल व वंचित आदिवासीविद्यार्थ्यांच्या कौशल्याभिमुख व्यवसाय शिक्षणाचा दर्जा व गुणवत्ता ढासळली आहे. खाजगी कंपन्या व त्रयस्थ संस्था यांच्या समग्र शिक्षा मधील अधिकाऱ्याशी असलेले लागे बांधे व आर्थिक हितसंबध याचा व्यवसाय शिक्षण व्यवस्थेवर मोठा नकारात्मक परिणाम होत आहे. समग्र शिक्षा कार्यालयाच्या बाजारीकरण धोरणामुळे राज्यात शासकीय शाळेत माध्यमिक वर्गाना व्यवसाय शिक्षण देणाऱ्या शिक्षकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतोय, परिणामी त्यांचे पगार, मासिक देयके तसेच विविध प्रात्यक्षिक खर्च सुद्धा गेल्या अनेक दिवसापासून रखडले आहेत. विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून येणारी पिढी सक्षम आणि स्वयंपूर्ण बनवणाऱ्या व्यवसाय शिक्षकांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. शिक्षणावर राज्याचे मोठे आर्थिक बजेट खर्च केले जाते परंतु नेमका हा पैसा जातो कोठे ? या प्रश्नाला अनुसरून अनेक वेळा समग्र शिक्षा, मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांना पत्रव्यवहार करूनही या ज्वलंत प्रश्नांना केराची टोपली दाखवली आहे, त्याचा जाब विचारण्यासाठी येत्या २६ डिसेंबर रोजी राज्याचे व्यवसाय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष शोभराज खोंडे व नागपूर विभागीय सचिव प्रफुल मुने तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आशिष राजनहिरे, कोषाध्यक्ष मयूर कश्यप यांच्या मार्गदर्शनाने जिल्यातील तमाम व्यवसाय शिक्षकांचा महामोर्चा विधान भवन नागपूर येथे होणार आहे आणि आपल्या न्याय हक्कासाठी संपूर्ण राज्यातील व्यवसाय शिक्षकांनी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
