४.५ कोटी रुपयाचा सूक्ष्म नियोजन आराखडा भुलगड ग्रामसभेत मंजूर

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

वन हक्क कायदा २००६ अंतर्गत राळेगाव तालुक्यातील २५ गावांना सामूहिक वन हक्क प्राप्त झाला आहे. या २५ गावांपैकी भुलगड हे पहिले गाव आहे ज्यांनी सामूहिक वन हक्क व्यवस्थापनाचा सूक्ष्म नियोजन आराखडा ग्रामसभेत मंजूर करून घेतला आहे. दिनांक ६ डिसेंबर १० डिसेंबर २०२२ दरम्यान गावात, आदिवासी प्रशिक्षण व संशोधन संस्था, पुणे व्दारा स्थापित व युनिसेक इंडिया व्दारा संचालित वन हक्क व पेसा कायद्याचे सूक्ष्म नियोजन आणि संसाधन केंद्र, यवतमाळ च्या तांत्रिक साहाय्याने व गावातील लोकांच्या सहकार्याने हा सूक्ष्म नियोजन आराखडा तयार करण्यात आला होता.
या सूक्ष्म नियोजन आराखड्याला ग्रामसभेत दिनांक २६/१२/२२ रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. या ग्रामसभेचे अध्यक्ष गावातील कवडू बोटूने होते. त्यांची एक मताने ग्रामसभा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. त्या नंतर अध्यक्षांच्या वतीने संसाधन केंद्रांचे विधी सल्लागार ॲड. वैभव पंडित यांनी संपूर्ण आराखडा ग्रामसभेत वाचून दाखविला. पाच वर्षाचा आराखडा तयार केला असून विविध कामे, कामांची संख्या, वर्ष निहाय केली जाणारे कामे, लागणार निधी, कोणत्या विभागाकडून दिला जाणारा निधी अश्या प्रकारे सविस्तर आराखडा लोकांना समजावून सांगण्यात आला. पाच वर्षातील एकूण खर्च जवळपास ४.५ कोटी रुपये इतका आहे हे विशेष. त्या नंतर गावकऱ्यांकडून प्रश्न व चर्चा केल्या गेली. ग्रामसभेत सूक्ष्म नियोजन आराखड्याला अंतिम मंजुरी मिळाल्या नंतर ग्रामसेवक जगदीश मडावी यांनी सचिव म्हणून सविस्तर ठराव लिहून घेतला. वन हक्क कायद्या व्दारे मिळालेल्या ६९२.१८ हेक्टर वन हक्काचे सूक्ष्म नियोजन प्रक्रिया मधून गावात रोजगार हमी योजना, वन विभाग, आदिवासी विकास प्रकल्प, कृषी विभाग, आमदार – खासदार अश्या विविध निधी चा उपयोग करून पाच वर्षात सूक्ष्म नियोजनातील सर्व कामे पूर्ण करण्यात येणार आहे.
या ग्रामसभेला गावातील ५० टक्के पेक्षा जास्त मतदार उपस्थिती होते. मजूरदार वर्ग मोठ्या प्रमाणात असताना अनेक लोकांनी मजुरी ला न जाता ग्रामसभेत उपस्थिती ला प्राधान्य दिले. या सामूहिक वन हक्क समितीचे पदाधिकारी अन्नू बोटूने, सौ. रेखाताई मानगी, हनुमान भुरकुटे, उत्तम मेश्राम, कवडू बोटूने, विलास जूनगरे, सौ. सुनीता भुरकुटे, सौ. सविता भिवणकर, विलास असोले तर ग्रामपंचायत चे पदाधिकारी रमेश आत्राम(सरपंच) विजय पाटील(उपसरपंच) सौ.लीलाताई शिलेकर,सौ. मंगलाताई चहानकर,सौ. दिक्षाताई मडावी, रंगराव भरकुटे,राहुल मानगी , सौ. छायाताई डंभारे,अनिल बावने, लालम किनाके
उपस्थितीत होते. तसेच प्रेरणा ग्रामीण विकास संस्थेचे पदाधिकारी याची उपस्थिती ग्रामसभेत होती. रस्ते, गटार, घरकुल, या भौतिक सुविधा च्या पलिकडे मानव विकास असतो हे या ग्रामसभेच्या माध्यमातून स्पष्ट झाले.